मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतोच, मी मुख्यमंत्री होणार होतो पण मला डावलून दुसऱ्याला मुख्यमंत्री बनवलं असं विधान भाजपा आमदार गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खडसेंनी केले आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसेंच्या टीकेला भाजपा नेते काय उत्तर देतात हे पाहणं गरजेचे आहे.(NCP Eknath Khadse Target BJP Devendra Fadnavis)
गेल्या काही दिवसांपासून जळगावात एकनाथ खडसेंनी ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. यात खडसेंनी भाजपा आमदार गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधल्याचं ऐकायला मिळत आहेत. या ऑडिओ क्लीपवरून गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतोच, मीच मुख्यमंत्री होणार होतो. पण मला डावलून दुसऱ्याला मुख्यमंत्री बनवलं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. ‘मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर’ यातला हा प्रकार आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील लोकांनी गेल्या महिनाभरापासून माझ्याकडे तक्रार केली. पिण्याचं पाणी नाही, हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होत नाही. आपली जबाबदारी सोडून तीन तीन आठवडे पश्चिम बंगालमध्ये प्रचार करायला जाणं कितपत योग्य आहे का? माझं संतुलन बिघडलं असं म्हणतात, मी ठणठणीत आहे खात्री करायची असेल तर येऊन बघावं. मला सगळं माहिती आहे. १९९४ च्या फर्दापूरच्या भानगडीपासून सगळं माहिती आहे. मी वैयक्तिक कमेंट केली नाही. मतदारसंघातील लोकांचा संताप आहे असा इशाराही एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना दिला आहे.
ब्राह्मण असल्यानं तुमचं भाकीत खरं ठरत नाही
सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस हे माशासारखे तडफडत आहेत. ते ब्राह्मण असले तरी त्यांची सरकार पडणार असल्याची भाकिते खरे ठरतं नसल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. देवेंद्र फडणवीसांना, सत्ता कधी येईल यासाठी मला वाटतं रात्री बेरात्री पण त्यांना स्वप्न पडत असेल. सध्या सरकार पडणार असे ते सांगत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या तारखांचे भाकीत करत आहेत. ते ब्राह्मण असल्याने त्यांचं भाकीत खरे ठरेल असं मला वाटत होतं. मात्र, त्यांचं कोणतही भाकीत खरं ठरलेले नाही असा टोला खडसेंनी फडणवीसांना लगावला होता.