बंगळुरु – कर्नाटकात भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये राजकीय हालचाली वारंवार सुरु आहेत. काँग्रेसची साथ सोडून भाजपात सहभागी झालेल्या आमदार श्रीमंत पाटील यांच्या विधानानं राजकीय वातावरण तापलं आहे. जेव्हा मी काँग्रेस सोडली तेव्हा भारतीय जनता पार्टीने मला सोबत येण्यासाठी मोठी रक्कम ऑफर केली होती. श्रीमंत पाटलांच्या विधानानं मोठी खळबळ माजली आहे. विरोधकांना भाजपावर टीका करण्याची आयती संधीच मिळाली.
आमदार श्रीमंत पाटील(MLA Shrimant Patil) यांनी दावा केला की, कुठलीही रक्कम न घेता मी भारतीय जनता पार्टीत(BJP) प्रवेश केला. जेव्हा काँग्रेस(Congress) पक्ष सोडला तेव्हा भाजपाने विचारलं किती पैसे हवेत? तेव्हा मी एक रुपयाही घेतला नाही असं त्यांनी सांगितले. परंतु श्रीमंत पाटील यांच्या विधानावरुन वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी भाजपाने मला पैसे ऑफर केले नव्हते असं मी कुठेही बोललो नाही. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला असा आरोप त्यांनी केला. श्रीमंत पाटील हे कर्नाटकच्या कागवाड परिसरातील आमदार आहेत. ते कॅबिनेट मंत्रीही होते. काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाची साथ सोडून भाजपात प्रवेश केला त्यातील श्रीमंत पाटील हे एक आमदार होते.
सध्याच्या कॅबिनेटबद्दल आमदार श्रीमंत पाटील म्हणाले की, मला कॅबिनेटमध्ये का घेतलं नाही हे सांगता येत नाही. परंतु कॅबिनेट विस्तारावेळी मला सहभागी करुन घेतलं जाईल असं पक्षाने म्हटलं आहे. भाजपा नेतृत्वाने कॅबिनेट खात्यांना घेऊन माझ्याशी चर्चा केली. जसं कॅबिनेटचा विस्तार होईल त्यात मला संधी मिळेल असा दावा त्यांनी केला. मराठा समुदायाला मी मंत्री व्हावं अशी इच्छा आहे त्यामुळे मला कॅबिनेटमध्ये स्थान दिले जाईल असा विश्वास आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला.
कर्नाटकच्या राजकारणात मागील काही काळापासून अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. अलीकडेच भारतीय जनता पार्टीने राज्याच्या नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेत बी.एस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला सारलं. कर्नाटकात बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. विधानसभा निवडणुकीपासूनच कर्नाटकचे राजकारण अस्थिर झाले आहे. काँग्रेस-निजदने एकत्र येत बहुमत असलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले. परंतू दीड वर्षानंतर त्यांचे आमदार फोडून भाजपाच्या येडीयुराप्पांनी पुन्हा सत्ता हिसकावून घेतली होती. त्यानंतर काही महिन्यापूर्वी कर्नाटकात मंत्रीमंडळ वाटपावरून भाजपाच्या आमदारांनी बंड पुकारले असून येडीयुराप्पा यांची खूर्चीच धोक्यात आली.