मुंबई : भाजपा सोडले नसते तर माझा अडवाणी, वाजपेयी केला असता असा खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांनी केला. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मला संन्यास घेण्यास सांगत होते, मी राजकारणातून बाहेर पडून सल्लागार व्हावे अशी त्यांची इच्छा होती, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला. मुक्ताईनगरमध्ये पोहोचल्यावर खडसे यांनी हे आरोप केले.
राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यानंतर खडसे हे मुक्ताईनगरला आल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी खडसे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले. भाजपामध्ये माझ्यावर खूप अन्याय सुरू होता. भाजपविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्तींनी माझ्यावर अन्याय केला. फडणवीस यांनी मला त्रास दिला, ही माझी भावना आहे. भाजपतच राहिलो असतो तर मी राजकीय विजनवासात गेलो असतो. परंतू शरद पवारांमुळे मी पुन्हा राजकारणात आलो, असे खडसे म्हणाले.
अडवाणी, अटलजींच्या बाबतीत जे झाले, तेच माझ्या बाबतीत झाले असते. पण मी गप्प बसणारा नव्हतो. मी सन्यास घ्यावा अशी चंद्रकांत पाटील यांची इच्छा होती. मार्गदर्शन करावे असं ते म्हणत होते. मी पक्षांतराचा निर्णय घेतला. शरद पवारांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश देऊन माझे राजकीय पुनर्वसन केले. मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपात आपल्याला अपमानाची वागणूक मिळाली. तेव्हा कार्यकर्ते चिडायचे, संताप व्यक्त करायचे. गेली चार वर्षे मी हा अन्याय सहन केला. माझे मंत्रिपद का काढले? हे आजही अनुत्तरित आहे. कदाचित पुन्हा मिळेल, पण जो अपमान झाला तो कसा भरून निघणार, असा सवालही खडसेंनी विचारला.
मी घरीच बसलो असतो...मी घरी बसलो असतो, मात्र शरद पवार यांनी पुन्हा मला राजकारणात आणले. येणारा काळ ठरवेल पुढे काय होईल. विधानसभा निवडणुकीच्या काळात मला तिकीट नाकारून कन्या रोहिणीला तिकीट दिले. मात्र, भाजपच्या काही लोकांनी रोहिणीच्या विरोधात काम करून त्यांना पाडले. याचे पुरावे मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना दिले होते. तरीही कुणावरही पक्षाकडून कारवाई झाली नाही. रोहिणी खडसेंच्या विरोधात काम करणाऱ्या भाजपच्या लोकांचे फोटो, व्हिडिओ मी दिले होते. या साऱ्या घडामोडींमुळे अनेक कार्यकर्ते नाराज होते.
तेव्हा राष्ट्रवादीने एबी फॉर्म आणला होता...मला तिकीट नाकारले तेव्हा राष्ट्रवादीने माझ्यासाठी एबी फॉर्म आणला होता. तेव्हाच जर का मी राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून उभा राहिलो असतो, तर मी निवडून आलो असतो. पण मंत्रीही झालो असतो. मंत्रीही झालो असतो. त्याचदिवशी राष्ट्रवादीकडून उभा राहिलो असतो तर राजकारणाचे चित्र वेगळे राहिले असते. भाजपातील काहींनी रोहिणी आणि माझ्यात भांडण लावले, असा गौप्यस्फोटही खडसे यांनी केला.