...तर वाराणसीत नरेंद्र मोदींचा ट्रम्प करून दाखवेन, काँग्रेसच्या एकमेव खासदाराने दिले आव्हान
By बाळकृष्ण परब | Published: January 16, 2021 07:16 PM2021-01-16T19:16:45+5:302021-01-16T19:22:20+5:30
Balu Dhanorkar challenges Narendra Modi : २०२४ च्या निवडणुकीमध्ये पक्षाने आदेश दिल्यास वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प करून दाखवेन अशी गर्जना राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.
मुंबई - पंतप्रधानपदासाठी दावेदारी केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवण्यासाठी उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघाची निवड केली होती. या मतदारसंघातून लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये मोदी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. मात्र आता २०२४ च्या निवडणुकीमध्ये पक्षाने आदेश दिल्यास वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प करून दाखवेन अशी गर्जना राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.
याबाबत बाळू धानोरकर म्हणाले की, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आज माझ्याकडे तीन वर्षांचा कालावधी आहे. पक्षश्रेष्ठींनी आदेश द्यावा, बाळू धानोरकर तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी वाराणसीला जावा. मग तिथे जाऊन निवडणूक नाही लडलो आणि नरेंद्र मोदींना नाही पराभूत केलं, तर मी बाळू धानोरकर नाही, असा इशाराच बाळू धानोरकर यांनी दिला आहे.
मी पक्षश्रेष्ठींकडे याच्यासंदर्भाच माहिती दिली आहे. सर्वांना सांगितलं आहे की मी तयार आहे. माझी एक अट आहे. की मोदींनीसुद्धा एकाच ठिकाणाहून निवडणूक लढवावी. एकतर ते राजकारणात राहतील किंवा मी राहीन, असे अव्हान बाळू धानोरकर यांनी दिले.
बाळू धानोरकर पुढे म्हणाले की, मोदी तिकडे सांगतात की ते चहा विकणाऱ्याचे मुलगे, चहा विकणारा होतो. मग हा बाळू धानोरकर काही कमकुवत नाही. २०१४ मध्ये जेव्हा शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे लढले तेव्हा मी शिवसेनेचा पूर्व विदर्भातील एकमेव आमदार होतो. पुढे २०१९ मध्ये मला भाजपाचे काही विचार पटले नाहीत म्हणून मी शिवसेना सोडून काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि अवघ्या १५ दिवसांच्या काळामध्ये मी हंसराज अहिर या तीन वेळा निवडून आलेल्या नेत्याला पराभूत केले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
माझी आतापर्यंतची कारकीर्द पाहिल्यास मी इतिहास घडवलेला माणूस आहे. इतिहास घडवायचा हाच माझा उद्देश आहे. राजकरणात येण्यासाठी किंवा पद, मंत्रिपदं घेण्यासाठी माझा जन्म झालेला नाही, असेही ते पुढे म्हणाले.