नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी माझ्यावर लावण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईन असंही म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकारने जर एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला राजकारणामध्ये प्रवेश करता येईल असा काही कायदा आणला तर मी लगेच राजकारण सोडून देईन असं देखील म्हटलं आहे. रविवारी एका रॅलीमध्ये जनतेला संबोधित करताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
डायमंड हार्बर मतदारसंघातून खासदार असलेल्या अभिषेक बॅनर्जी यांनी यांनी कुलताली विधानसभा मतदारसंघातील एका सभेला संबोधित करताना भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच कुटुंबातील एकाहून अधिक सदस्य राजकारणात येऊ शकत नाही अशा पद्धतीचा काही कायदा आणणार असतील तर पुढच्या क्षणी मी राजकीय आखाड्यातून बाहेर पडेन असं अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. "कैलाश विजयवर्गीय यांच्यापासून शुभेन्दु अधिकारींपर्यंत आणि मुकुल रॉय यांच्यापासून ते राजनाथ सिंह यांच्यापर्यंत भाजपा नेत्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य भाजपाच्या महत्वाच्या पदांवर आहेत."
"जर एका कुटुंबातील एकच सदस्य सक्रीय राजकारणामध्ये असण्याबद्दलचा कायदा केला तर तृणमूल काँग्रेस पक्षाकडून केवळ ममता बॅनर्जी राजकारणात असतील, असा मी शब्द देतो" असं अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त शनिवारी व्हिक्टोरिया मेमोरियलमधील घटनेचा संदर्भ देत बॅनर्जी यांनी जय श्री रामच्या घोषणा मुद्दाम देण्यात आल्या. ममता यांनी भाषण देऊ नये म्हणून या घोषणा करण्यात आल्या असं देखील अभिषेक बॅनर्जी यांनी दिलं आहे. जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्याने ममता यांनी भाषण देण्यास नकार दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"रामाचं नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवं, गळा दाबून नाही", नुसरत जहाँ संतापल्या
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. नुसरत जहाँ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "रामाचं नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवं, गळा दाबून नाही. स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सरकारी कार्यक्रमात अशाप्रकारच्या राजकीय आणि धार्मिक घोषणा देणाऱ्यांचा मी तीव्र निषेध करते" असं नुसरत जहाँ यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांनी देखील घोषणा ऐकल्यानंतर कार्यक्रमात काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मी निषेध म्हणून काहीही बोलणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे.