पुणे: मला बोलण्याचा अनेकदा आग्रह होतो. मात्र, बोलण्यासाठी मी आचारसंहितेची वाट पाहत असून माझा निवडणुकीचा तोफखाना तयार आहे व तो योग्य वेळी आग ओकणार आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. इतकेच नव्हे तर माझ्या हाती सत्ता द्या, चमत्कार घडवून दाखवू असेही ते म्हणाले.
कोंढवा खुर्द येथील स्व. राजेंद्र बाळासाहेब लोणकर ई लर्निंग स्कुलच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे महापालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे, स्थानिक नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेविका आरती बाबर, रूपाली पाटील, किशोर शिंदे, शेखर लोणकर उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, निवडणूक लागल्यावर योग्यवेळी तोफखाना बरोबर घेऊन येईल व तुमच्यासमोर फोडेल. योग्य वेळी योग्य गोष्टी बोलल्या की त्या योग्य ठिकाणी पोहोचतात त्यामुळे तुम्ही वाट पहा, अशी विनंती त्यांनी केली. पुढे ते म्हणाले की, या निवडणुकीत मनसेचे दोन नगरसेवक पुणे महापालिकेत निवडून आले आहे. हे दोघेजण चांगले काम करीत आहे. त्यांना संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या कार्यामुळे ओळखत आहे असेही ते म्हणाले.