नवी दिल्ली –काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे ४ दशकांच्या संसदीय कालावधीनंतर राज्यसभेतून निवृत्त झाले. जवळपास २८ वर्ष ते राज्यसभेचे खासदार होते, त्यांच्या निरोप समारंभावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाम नबी आझाद यांच्या कामाचं खूप कौतुक केले होते. इतकचं नव्हे तर एका घटनेचा उल्लेख करत मोदींना अश्रूही अनावर झाले. पंतप्रधानांसोबत भाजपाच्या अनेक नेत्यांनी आझाद यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणानंतर सोशल मीडियात राजकीय चर्चा सुरु झाल्या. गुलाम नबी आझाद हे भाजपात प्रवेश करतील असं सांगितलं जात होतं, परंतु या सर्व चर्चेवर खुद्द गुलाम नबी आझाद यांनी भाष्य करत त्यावर मौन सोडलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आझाद म्हणाले की, ज्या दिवशी काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल त्यादिवशी मी भाजपात प्रवेश करेन असं स्पष्ट केले आहे
या मुलाखतीत आझाद यांनी सांगितले की, ज्यादिवशी काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल त्यादिवशी मी भाजपात प्रवेश करेन, फक्त भाजपाच नाही तर अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतो, जे लोक अशाप्रकारे अफवा पसरवत आहेत त्यांना माझ्याबद्दल काही माहिती नाही. जेव्हा राजमाता शिंदे विरोधी पक्षाच्या उपनेत्या होत्या तेव्हा माझ्यावर आरोप केले होते. तेव्हा मी सांगितलं होतं अटलबिहारी वाजपेयी, शिंदे आणि एल के अडवाणी यांची कमिटी बनवून १५ दिवसांत रिपोर्ट द्यावा, कमिटी जी शिक्षा देईल ते मान्य असेल. त्यावेळी वाजपेयी सभागृहात म्हणाले होते, मी सभागृह आणि गुलाम नबी आझादांची माफी मागतो, कदाचित राजमाता शिंदे या त्यांना ओळखत नाही परंतु मी त्यांना ओळखतो असं आझाद यांनी सांगितले.
निरोपावेळी काँग्रेस पक्षाने दिलेल्या प्रतिक्रियेवर आझाद म्हणाले की, पक्षाच्या अध्यक्षांनी माझ्या कामाची प्रशंसा केली. आता आपल्याला पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी मिळून काम करायचं आहे असं सांगितले, त्यानंतर मी सोनिया गांधी यांची भेट घेतली, तेव्हा निवडणुकीसाठी तयार राहण्याचं त्या म्हणाल्या.
काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी?
आझाद असे नेते आहेत जे आपल्या पक्षासह सभागृह आणि देशाची काळजी करत असतात. दोन्ही सभागृहांतील आझाद यांच्या कार्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, त्यांची विनम्रता, शांतता आणि देशासाठी काही करण्याची इच्छा कौतुकास्पद आहे. आझाद यांची ही कटिबद्धता त्यांना आगामी काळातही शांत बसू देणार नाही. त्यांचा अनुभवाचा देशाला लाभ होत राहील असं सांगत मोदींनी काश्मीरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत भावूक झाले.
आझाद केरळमधून पुन्हा राज्यसभेत जाणार?
उच्चपदस्थ सूत्रांनुसार एप्रिलमध्ये आझाद राज्यसभेत परत येतील व तोपर्यंत काँग्रेस नवा विरोधी पक्ष नेता करणार नाही. आझाद राज्यसभेत परत आल्यानंतर ते विरोधी पक्ष नेता असतील. १०, जनपथच्या निकट सूत्रांनुसार सोमवारी आझाद सोनिया गांधी यांना भेटायला गेले तेव्हा आझाद यांची राज्यसभेच्या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. जेव्हा आझाद यांनी काश्मीरमधूनच सभागृहात येण्याचा विषय काढला तेव्हा तेव्हा त्यांना मध्येच थांबवत सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘काश्मीर नाही केरळमधून परत याल.’ २१ एप्रिल रोजी केरळच्या तीन सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यात आययूएमएलचे अब्दुल वहाब, माकपचे के.के. रागेश आणि काँग्रेसचे वायलार रवि यांचा समावेश आहे. पक्ष सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधी वायलार रवि यांच्या जागी आझाद यांना संधी देऊ इच्छितात.
हिंदुस्थानी मुस्लिम असल्याचा अभिमान
गुलाम नबी आझाद म्हणाले होते की, मी नशिबवान आहे की, कधी पाकिस्तानात गेलो नाही. पण, मी जेव्हा तेथील परिस्थितीबाबत वाचतो, ऐकतो तेव्हा मला याचा अभिमान होतो की, आम्ही हिंदुस्थानी मुस्लिम आहोत. जगात जर कुणा मुस्लिमांना अभिमान असायला हवा, तर तो हिंदुस्थानी मुस्लिमांना असायला हवा.