"तुम्ही आमदार करा, मी लाल दिव्याची गाडी देतो", अजित पवारांनी दिला शब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 03:04 PM2024-09-12T15:04:11+5:302024-09-12T15:08:01+5:30
Ajit Pawar Dilip Mohite : राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीच्या जोरात तयारी सुरू केली आहे. अजित पवार विविध मतदारसंघांचा दौरा करत असून, खेड-आळंदीतील मतदारांना अजित पवारांना शब्द दिला.
Ajit Pawar Latest News : लोकसभा निवडणुकीतील अपयश बाजूला सारत अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार महाराष्ट्रात फिरत आहे. दुसरीकडे विविध मतदारसंघात जाऊन चाचपणी करतानाही अजित पवार दिसत आहे. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांनी दिलीप मोहितेंना मंत्री करण्याचा मतदारांना शब्द दिला.
महायुतीत जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच अजित पवारांनी दिलीप मोहितेंना खेड-आळंदीतून उमेदवारी देण्याबद्दल भाष्य केले.
अजित पवार म्हणाले, "चुकलो तर आमचे कान पकडा"
उपस्थितांशी संवाद करताना अजित पवार म्हणाले, "भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळे मी खेड-आळंदीच्या जनतेला सांगतोय, भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. काही दिवस आम्हाला द्या, चुकलो तर आमचे कान पकडून जाब विचारा. तुमचा तो अधिकार आहे. मात्र, भावनिक होऊन काही वेगळा निर्णय घेऊ नका. तुमचा आशीर्वाद द्या. पाठिंबा द्या."
खेड-आळंदीतून दिलीप मोहिते पाटलांना उमेदवारी देण्याबद्दलही अजित पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले, "महायुतीच्या जागा वाटपात खेड-आळंदीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली, तर पुन्हा एकदा दिलीप मोहिते पाटलांना निवडून द्या. ग्रामपंचायत ते आमदारापर्यंत गाडी पोहोचली आहे. आता दिव्यापर्यंत गाडी पोहोचवण्यासाठी साथ द्या. दिलीप मोहितेंना आमदार करा, खेड-आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो."
"कार्यसम्राट असणे आणि आक्रमक असणे यात फरक आहे. दिलीप मोहिते पाटील हे आक्रमक आहेत. त्यांचा आक्रमकपणा त्यांच्या पत्नी कसा नियंत्रणात आणत असतील, ही खरंच कौतुकाची बाब आहे. म्हणून मी सुरेखा ताईंना मानतो", असे मिश्कील भाष्य अजित पवारांनी यावेळी केले.
"लोकं म्हणतील हा कोण लागून गेला"
आळंदीतील दर्शनाबद्दलही अजित पवार बोलले. "देवाच्या आळंदीत चुकीचे धंदे चालताहेत. वेडे-वाकडे प्रकार होताहेत. आपण तिथे नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाही. मागे आलो तेव्हा दोन तास रांगेत थांबावे लागले. लोकं म्हणतील, हा कोण लागून गेला. जे याला डायरेक्ट दर्शन दिले जाते, असे भाविक म्हणणार म्हणून मी आज बाहेरून दर्शन घेतले", असे अजित पवार म्हणाले.