पाटणा - बिहारमध्ये सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. याच दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी पाटणा आणि गोपालगंजमधील निवडणूक सभांना संबोधित केलं. यावेळी राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "सगळं उघड केलं ना तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल" असं म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी अनेकदा भाजपावर यावरून टीका केली होती. त्यामुळे आता राजनाथ सिंह यांनी हल्लाबोल केला आहे.
"काँग्रेससह काही राजकीय पक्ष देशाच्या सैन्याच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. चीनने भारताची 1200 चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली असं काँग्रेस म्हणत आहे. पण आपण जर सगळं उघड केलं ना तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल" असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच "तुम्ही सुशिक्षित नागरिक आहात. 1962 ते 2013 दरम्यानचा इतिहास बघा. आपल्या सैन्यातील जवानांनी जे शौर्य दाखवले आहे त्याने अभिमानाने मान उंचावते. संरक्षणमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो" असं देखील म्हटलं आहे.
जून महिन्यापासून भारत आणि चीनमधील संबंध ताणले असून गलवान घाटीत भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यामध्ये, देशाच्या 20 जवानांना वीरमरण आले. चीनसोबतच्या या झटापटीच्या संघर्षात भारतानेही चोख प्रत्युत्तर देत चीनच्या जवळपास 40 सैन्यांना ठार केले होते. लडाख सीमारेषेवरील या संघर्षाची धग अद्यापही कायम असून चीनकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, भारतीय सैन्य चीनच्या या कटूनितीला जशास तसे उत्तर देत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनीही लडाख सीमारेषेवर जाऊन चीनला ठणकावले होते. तसेच, भारत हा शांतीप्रिय देश असून विस्तारवादाला आपल्याकडे थारा नसल्याचंही मोदींनी म्हटलं होतं.
"राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवताहेत", मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राम मंदिराच्या उभारणीवरून त्यांनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे. "राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवताहेत" असं म्हणत पंतप्रधान मोदींनी निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांनी "गेल्या अनेक वर्षांच्या तपस्येनंतर आता राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरू झालं आहे. राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवत आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यात आम्ही मदत पोहोचवणार असल्याचं सांगितलं होतं. आतापर्यंत जवळपास एक लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे" असं म्हटलं आहे.
"जवळपास 90 लाख महिलांना लाकडाच्या धुरापासून मिळाली मुक्ती"
"आज जवळपास 40 कोटी गरीबांची बँक खाती उघडली आहेत. आम्ही उज्ज्वला योजनेचीही घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत बिहारमधील जवळपास 90 लाख महिलांना लाकडाच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे,” मोफत उपचार देण्याची घोषणाही केली होती. आज बिहारच्या प्रत्येक गरीब व्यक्तीला याचा लाभ मिळत आहे. कोरोनाच्या संकटात गरीबांना मोफत अन्नधान्य देणार असल्याचं म्हटलं होतं. ते देखील होत आहे" असं देखील मोदींनी म्हटलं आहे.