पुणे - बिहारमध्ये सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. याच दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. "तेजस्वी यादवबिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची असते" असं राऊत यांनी म्हटलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचं एकंदर चित्र पाहिलं तर उद्या तेजस्वी यादव बहुमताने बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण जनभावना महत्त्वाची असते. ती दाबता येत नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे.
"ज्या मुलाच्या पाठीमागे सध्या पाठबळ नाही. त्याच्या घरातली माणसं तुरुंगात आहे. मग ती कोणत्याही कारणास्तव असो. त्याच्या कुटुंबाच्या पाठीमागे इन्कम टॅक्स, सीबीआयचा ससेमिरा लावला जात आहे. तोच तरुण मुलगा हजारो लाखोंच्या सभा घेतोय आणि केंद्रीय राजसत्तेला आव्हान निर्माण करतोय. मला वाटतं बिहारच्या निवडणुकीचं एकंदर चित्र पाहिलं तर उद्या तेजस्वी यादव बहुमताने बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण जनभावना महत्त्वाची असते. ती दाबता येत नाही" असं राऊत यांनी म्हटलं आहे.
"काही लोकांमध्ये ठाकरे सरकार पंधरा दिवसांत कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या"
बिहारची जशी जनभावना आता आपल्याला दिसून येते तेच महाराष्ट्रात झालं, तेच आता इतर राज्यांत होईल. बिहारमध्ये नॉन भाजप सरकार बनेल असंही त्यांनी म्हटलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त संजय राऊत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "महाराष्ट्रात काही लोकांना महाविकास आघाडी सरकार अस्तित्वातच येणार नाही असा पूर्ण विश्वास होता. परंतू, माझ्यासारख्या काही लोकांना राज्यात सत्तांतर होऊन याप्रकारे तीन पक्षांचे मिळून सरकार बनवता येईल असे खात्रीपूर्वक वाटत होते. आणि तसे करून देखील दाखवले. यादरम्यान काही लोकांमध्ये ठाकरे सरकार १५ दिवसांत कोसळेल अशा पैजा सुद्धा लागल्या होत्या. पण महाविकास आघाडी सरकारची लवकरच वर्षपूर्ती होते आहे" असं राऊत यांनी म्हटलं आहे.
राऊतांनी विरोधकांना लगावला सणसणीत टोला, म्हणाले...
आमचे सरकार पूर्ण शक्तीनिशी कार्यरत असून ते पाच वर्ष टिकेल असे ठाम मत नोंदवताना संजय राऊत यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. "आमच्यासाठी मधला काही काळ परीक्षा पाहणारा होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या यांच्या नेतृत्त्वात या संकटांचा आम्ही उत्तमप्रकारे सामना केला. बाकीच्या राज्यांमध्ये गेला तर त्याचं महत्त्व पटेल. तिथे कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाही. उद्धव यांनी कोरोना संकटाशी लढताना सक्षमपणे नेतृत्व केलं त्यामुळे आपले कमी नुकसान झाले. अन्यथा अराजकता निर्माण झाली असती" असं देखील म्हटलं आहे.