ठाणे : ठिणगी लावली तर आग भडकणारच. घरी बसलेल्या नेत्याला बोलण्याची संधी मिळावी, त्यासाठी हे सर्व सुरु आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश शिवसैनिक पाळतात. परंतू, आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक अशीच सुरु राहिली तर पालकमंत्री घेतील तो निर्णय मान्य असेल. पण वैयक्तिकरित्या अशी महाविकास आघाडी नको अशी उद्वीग्नता ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा महापौर नरेश म्हस्के यांनी रविवारी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनी महापौरांवर केलेल्या टीकेनंतर म्हस्के यांच्यासह जेष्ठ नगरसेवक राम रेपाळे, विकास रेपाळे आणि योगेंद्र जानकर यांनीही लगोलग पत्रकार परिषद घेऊन परांजपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडी असल्यामुळे कोणतेही राजकीय भाषण किवा टीका टीप्पणी नको, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. त्यांचे आदेश शिवसैनिक पाळतात. परंतू, आव्हाड यांनी मात्र टीकाटीप्पणी केली. तो विषय संपला. दिशा बदलूनही आपली हालत काय झाली? हे ज्यांना समजले नाही, त्यांनी महापौरांना कळले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. कलियुगातील कलींना पुरुन उरण्यासाठी या नारदाची गरज असल्याचेही महापौर म्हणाले.
शिवसेनेत नसतो तर महापौर झालो नसतो. त्यामुळे पक्षासाठी काम करणे हे आपले कर्तव्य आहे. स्मार्ट सिटीमध्ये आपल्याप्रमाणे राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेतेही संचालक आहेत. ही कंपनी कायद्याप्रमाणे चालते. याच्या कामकाजाची माहिती करुन घ्यावी, मगच कमिशनचा आरोप करावा, असेही महापौर म्हणाले. तर शिवसैनिकांनी चपला झिजवल्यामुळेच दिवंगत प्रकाश परांजपे यांच्यानंतर आनंद हे खासदार झाले होते, अशी आठवण जानकर यांनी करुन दिली. आघाडीतील खऱ्या अर्थाने नारमुनी हे आनंद परांजपे असल्याचे विकास रेपाळे म्हणाले.
मुंब्रा येथील वाईट कामाचा दोष राष्ट्रवादीचे विरोधीपक्ष नेते शानू पठाण महापौरांना देतात. मग चांगल्या कामाचे श्रेय देखील द्यायला हरकत नाही. निधी पाहिजे असल्यास नारदमुनी चालतो का? असा सवालही महापौरांनी उपस्थित केला. मिशन कळवा जर राष्ट्रवादीला झोंबले असेल तर आघाडी होईल नाही होईल. यापुढे मिशन मुंब्रा, वागळेच नव्हे तर बालेकिल्ला असल्यामुळे शिवसेना मिशन ठाणे महापालिका राबविणार असल्याचा दावाही त्यांनी केला. चिखल उडवून घ्यायचा नसून आता आमच्यासाठी हा विषय संपल्याचेही त्यांनी जाहीर केले.