मुंबई : "बाळासाहेबांच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीत बुडवून शिवसेनेने सत्ता मिळवली. पण आम्ही तुमच्या मार्गाने चालणार नाही. आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेनाच उरली नसती", असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले होते. यावरून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या शैलीतच ट्विट करत अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. “घमंड ज्यादा हो तो, हस्तियाँ डूब जाती है”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी अमित शाह यांना टोला लगावला आहे.
"तुफान ज्यादा हो तो,कश्तियाँ डूब जाती हैऔर घमंड ज्यादा हो तो,हस्तियाँ डूब जाती है", असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
दरम्यान, शिवसेनेने भाजपाची युती सोडून महाराष्टात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर जवळपास दीड वर्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवरून निशाणा साधला. काल सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी अमित शाह बोलत होते. यावेळी बाळासाहेबांच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीत बुडवून शिवसेनेने सत्ता मिळवली. पण आम्ही तुमच्या मार्गाने चालणार नाही. आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेनाच उरली नसती, असे विधान अमित शहा यांनी केले होते.
अमित शाह यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधल्यामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण तापले आणि कालच संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. "१९७५ मध्ये रजनी पटेल आणि ९० च्या दशकात कदाचित मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल असं भाकित केलं होतं. २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील त्याच गोष्टीचा पुनरूच्चार केला. दोन्ही वेळी शिवसेना आधीपेक्षा अधिक ताकदीनिशी पुढे आली. जय महाराष्ट्र," असे ट्विट करत संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त दिली होती. त्यांनतर हा वाद इथेच न संपता संजय राऊत यांनी आज पुन्हा ट्विट करत अमित शाह यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते अमित शहा?महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शाह यांनी सांगितलं. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर यावेळी थेट टीका केली. "शिवसेनेनं खोटंनाटं बोलून आमच्याशी दगाबाजी केली. मी बंद खोलीत वचन दिल्याचं म्हटलं गेलं. पण मी असं कोणतंच वचन दिलं नव्हतं. मी बंद खोलीत नव्हे, तर खुलेआम वचन देणारा आणि ते पाळणारा व्यक्ती आहे. बिहार निवडणुकीत फडणवीस प्रभारी असताना आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करू असं वचन दिलं होतं. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यापेक्षा भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या, पण आम्ही दिलेलं वचन पाळलं आणि नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री केलं. आम्ही वचन एकदा दिलं की पाळतो", असं अमित शाह म्हणाले होते.
आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती; अमित शाहंचा हल्लाबोल