नवी दिल्ली - बिहार विधानसभेची निवडणूक कोण जिंकणार यापेक्षा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण बनणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. बिहारमध्ये सध्या भाजपा आणि जेडीयू यांची आघाडी असली आणि ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येत असली तरी निवडणुकीच्या निकालांनंतर नेमकी काय समिकरणे तयार होतील, याचा अंदाज घेतला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री कोण होणार हे, स्पष्टच सांगून टाकले आहे.बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपा आणि जेडीयूमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अमित शाहा यांनी न्यूज १८ नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. अमित शाहा म्हणाले की, निवडणुकीनंतरच्या परिस्थितीतीबाबत ज्या काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यावर मी पूर्णविराम लावू इच्छितो. नितीश कुमार हेच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील. देशाबरोबरच बिहारमध्येसुद्धा मोदी लाट आहे. त्यामुळे आघाडीच्या सहकाऱ्यांना समानपणे मदत मिळेल. नितीश कुमार हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे आघाडी मोडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही.अमित शाह यांनी पुढे सांगितले की, बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळाल्या तरी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री बनतील. अमित शाहा यांच्या या विधानामुळे बिहारमध्ये निवडणुकीनंतर नवी समिकरणे उदयास येण्याच्या चर्चेस पूर्णविराम मिळणार आहे.दरम्यान, या मुलाखतीत तनिष्कच्या वादग्रस्त जाहीरातीबाबतही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रथमक प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह म्हणाले की, भारतात सामाजिक समरसतेची पाळेमुळे भक्कम आहेत. त्यावर असे हल्ले करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. इंग्रजानींसुद्धा हा सद्भाव तोडण्याचा प्रयत्न केला. पुढे काँग्रेसनेसुद्धा तसाच प्रयत्न केला, असे अमित शाह म्हणाले. यावेळी अमित शाह यांनी ओव्हरअॅक्टिव्हिझमविरोधात इशारासुद्धा दिला. ते म्हणाले की, मला वाटते की, अतिसक्रियतेचे कुठलेही रूप असता कामा नये.बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
बिहारमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाहांनी स्पष्टच सांगितलं
By बाळकृष्ण परब | Published: October 17, 2020 9:34 PM
Bihar Assembly Election 2020 News : बिहारमध्ये सध्या भाजपा आणि जेडीयू यांची आघाडी असली आणि ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येत असली तरी निवडणुकीच्या निकालांनंतर नेमकी काय समिकरणे तयार होतील, याचा अंदाज घेतला जात आहे.
ठळक मुद्देबिहार निवडणुकीनंतरच्या परिस्थितीतीबाबत ज्या काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यावर मी पूर्णविराम लावू इच्छितोनितीश कुमार हेच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील.नितीश कुमार हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे आघाडी मोडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही