पुणे :काँग्रेसला आमचे विचार चालतात पण आम्ही चालत नाही. त्यांना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या पक्षप्रवेशाला वेळ आहे मात्र सामान्य कार्यकर्त्यांसाठी नाही अशा शब्दांत संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी आपली खंत बोलून दाखवली. पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, रिपाई आणि इतर पक्षांच्या युवक पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी गायकवाड यांनी आपल्या भावना बोलताना निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले.
पुढे ते म्हणाले की. कॉग्रेसकडून पुणे शहर लोकसभा मतदार संघातून इच्छुक असल्याने अद्याप पक्षाचा उमेदवार जाहीर होत नाही. आमचे विचार चालतात, आम्हाला मार्गदर्शक म्हंटले जाते, मात्र, उमेदवार म्हणून आम्ही चालत नाही. मी काँग्रेसकडून उमेदवारी मागितल्यानंतर मला आपण पक्षाचे सदस्य आहात का ? असा प्रश्न करण्यात आला. मी त्यांना सांगितले की गेली पंचवीस वर्ष मी पक्षाचा मतदार आहे. मतदाराला पक्ष उमेदवारीची संधी देणार आहे की नाही, हे कळतच नाही. राज्यातील इतर जागांवर काँग्रेसला आयात उमेदवार चालतात. तर मी मागील कित्येक वर्षापासुन सामाजिक क्षेत्रात काम केले असताना देखील मला उमेदवारी नाकारल्याचेही ते म्हणाले.