कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेला केंद्र सरकारने गंभीरपणे घेतले असून राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्याकडून अहवाल मागविला होता. धनखड यांचा अहवाल मिळताच केंद्राने तातडीने बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना दिल्लीला बोलवून घेतले असून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत.
पश्चिम बंगामध्ये राज्यपाल धनखड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, राज्यात कायदा सुव्यवस्थेची हालत बिघडलेली आहे. पश्चिम बंगालची सुरक्षा करणे माझी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना संविधानाचे पालन करावेच लागणार आहे. कालच्या घटनेबाबत ममता बॅनर्जींनी माफी मागायला हवी. मानवाधिकाराच्या दिवशी मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यात आले. कालचा हल्ला हा लोकशाहीवरील डाग आहे. लोकशाहीत सर्वांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे.
कैलास विजयवर्गीय बचावले; काच तोडून आतमध्ये घुसला फेकलेला दगड
यानंतर त्यांनी ममता यांना इशारा देताना ममता यांनी संविधानाचे पालन करावे, जर तसे झाले नाही तर माझा रोल सुरु होणार आहे, असा इशारा धनखड यांनी दिला आहे. राज्यात कोण बाहेरचा आणि कोत आतला असे वक्तव्य ममतांनी करू नयेत. मुख्यमंत्र्यांनी आगीशी खेळू नये.
डीजीपी, मुख्य सचिवांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यातधनखड यांनी सांगितले की, कालच्य घटनेवर डीजीपी, मुख्य सचिव यांच्याशी चर्चा केली आणि आक्षेप नोंदविला. मी त्यांना अहवाल देण्याचे लिखित आदेश दिले. मात्र, ते कोणतेही इनपूट किंवा रिपोर्ट न घेता आले. राज्याचे पोलीस आता राजकीय पोलीस झाले आहेत का? राज्याची हालत बिघ़डत चालली आहे. केवळ भ्रष्टाचार सुरु झाला आहे. सरकारी तंत्राचे राजकीय आखाडे झाले आहेत आणि विरोधकांना कोणतीही जागा दिलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
नड्डांच्या ताफ्यावर हल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भाजपा २०० जागा जिंकेल असे विश्वास व्यक्त केला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशीच जेपी नड्डांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मोठमोठे दगड, सिमेंटचे ब्रिक्स फेकून गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्याने मोठे तणावाचे वातावरण आहे. ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात डायमंड हार्बरमध्ये जात होते. भाजपाने आरोप केला की, नड्डा आणि कैलास विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. दक्षिण 24 परगनामध्ये टीएमसी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचा आरोप आहे की, टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजपाचे अध्यक्ष नड्डा यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे दगड फेकले. सुरक्षा दलाने नड्डांच्या कारला सुरक्षित बाहेर काढले.