मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केले आहेत. याबाबत धनंजय मुंडे यांनी काल (12 जानेवारी) फेसबुकवर संबंधित महिलेने केलेले आरोप ब्लॅकमेलिंग करणारे आणि खोटे आहेत, असे सांगत करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडेंवरील आरोप आणि महिला अत्याचारांच्या घटनांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. एखादी महिला कॅबिनेट मंत्र्यावर आरोप करते, हे खूप गंभीर आणि धक्कादायक आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकता स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा आणि राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी करत संबंधित महिलेने केलेल्या आरोपामध्ये काही जर तथ्य असेल आणि धनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणे शिक्षा व्हावी, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, कितीही मोठा नेता असु द्या… दोषींना पाठीशी घालू नका.. जोपर्यंत संपूर्ण तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले पाहिजे तसंच अशा मोठ्या घटनांमध्ये पीडिता व तिच्या कुटुंबीयांवर दबाव येऊ शकतो. पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ शकते, तपास कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात म्हणून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
तक्रार करणारी महिला आणि धनंजय मुंडे यांच्या म्हणण्याप्रमाणे ते संबंधात असलेली महिला दोघीही एकाच घरात राहतात, मात्र मोठी बहीण यावर काहीच बोलत नाही. तिची मोठी बहीण याप्रकरणी का बोलत नाही?, असा सवाल उपस्थित करताना आपल्या छोट्या बहीणीसाठी करुणा शर्मा यांनी धावून यायला हवे, असेही चित्रा वाघ यांनी सांगितले.
महाराष्ट्रात एका दिवसात सामूहिक बलात्काराच्या तीन घटना घडतात. महाराष्ट्र कुठे चालला आहे, असे सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच, औरंगाबाद आणि माहिमच्या केसमध्ये गुन्हा दाखल होऊनही सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या महिला अत्याचारांचा आरोप असणाऱ्या आरोपींना अटक केली नाही, त्यामुळे महिलांवर अत्याचार करण्याचे मनोबल वाढत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला. याचबरोबर, पोलीस आणि सरकराची महिलांबद्दलची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत राज्यातील महिला आणि लेकीबाळी सुरक्षित राहणार नाहीत, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.