'इंदिरा गांधींना 1971च्या युद्धाचं श्रेय दिलं जातं; मग मोदींना बालाकोटचं श्रेय का देऊ नये?'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 11:49 AM2019-05-18T11:49:33+5:302019-05-18T11:55:14+5:30
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांचा सवाल
नवी दिल्ली: तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना 1971 च्या युद्धातल्या विजयाचं श्रेय दिलं जातं, मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बालाकोटचं श्रेय का देऊ नये, असा सवाल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी विचारला. भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न मोदी करत असल्याचा आरोप काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केला. त्यावर पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री असलेल्या सिंह यांनी जोरदार टीका केली.
स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा जेव्हा शेजारी देशांसोबत युद्धं झाली, तेव्हा त्यातील विजयाचा किंवा पराभवाचा संबंध थेट तत्कालीन सरकारच्या, तेव्हाच्या पंतप्रधानांच्या कामगिरीशी जोडण्यात आला, असं सिंह म्हणाले. त्यामुळेच 1971 मध्ये भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचं श्रेय इंदिरा गांधींना दिलं जातं. बांगलादेशच्या निर्मितीबद्दल त्यांचं कौतुक होतं. तर 1962 मध्ये चीनविरुद्ध स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाला तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंना जबाबदार धरलं जातं, असं सिंह यांनी म्हटलं.
देशातील सर्वसामान्य जनता एअर स्ट्राइक केल्याबद्दल मोदींचं कौतुक करत आहे. देशवासीयांकडून सुरू असलेलं हे कौतुक काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष कसं काय थांबवणार, असा सवाल सिंह यांनी उपस्थित केला. भारतीय जनता संघाचे तत्कालीन इंदिरा सरकारसोबत राजकीय मतभेद होते. पण पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात त्यांनी सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला होता, असंही सिंह यांनी म्हटलं. मात्र आता सत्तेसाठा आसुसलेला काँग्रेस पक्ष अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला अनुकूल भूमिका घेत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.