पुणे – MPSC परीक्षेत पास होऊन मुलाखतही झाली. परंतु दीड वर्ष नियुक्ती रखडल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरूणाने आत्महत्या केली. MPSC तरूणाने अशाप्रकारे आत्महत्या केल्याने विरोधकांनी सत्ताधारी ठाकरे सरकारला कोंडीत पकडलं. राज्यातील तरूण आत्महत्या करत असताना सरकार मात्र झोपले आहे असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. आज पुण्यात स्वप्निल लोणकरच्या कुटुंबांची मनसे नेते अमित ठाकरे यांनी भेट घेतली.(MNS Amit Thackeray Reaction on MPSC Student Swapnil Lonkar Suicide)
या भेटीनंतर माध्यमांशी अमित ठाकरेंनी संवाद साधला. ते म्हणाले की, भविष्यात जर MPSC च्या मुलांना न्याय मिळाला तर तो फक्त स्वप्नीलच्या त्यागामुळे असेल. या लढाईत तुम्ही एकटं नसून संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सोबत आहे असा धीर स्वप्निलच्या कुटुंबीयांना दिला आहे. शासनामध्ये लाखभर जागा रिक्त आहेत मग मुलं अशा टोकाला पोहचेपर्यंत सरकार झोपलं आहे का? असा सवाल अमित ठाकरेंनी सरकारला विचारला आहे. मनसेकडून स्वप्निलच्या कुटुंबीयांना २ लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतरही अमित ठाकरेंनी फेसबुक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली होती. स्वप्निलच्या आत्महत्येने अवघा महाराष्ट्र हळहळत आहे.'एमपीएससी'ची परीक्षा प्रक्रिया रखडल्यामुळे स्वप्नील लोणकर या हुशार तरुणाने आत्महत्या केल्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळत आहे. भरपूर अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी बनून महाराष्ट्राची सेवा करू इच्छिणारा स्वप्नीलसारखा एक संवेदनशील तरुण जर 'एमपीएससी हे मायाजाल आहे' असं म्हणत आत्महत्या करत असेल, तर त्याच्या या म्हणण्याला सर्वांनीच अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे अमित ठाकरे म्हणाले होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तीन आवडते उद्योग
परीक्षा दिरंगाई, निकाल दिरंगाई आणि नियुक्ती दिरंगाई हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तीन आवडते उद्योग आहेत आणि त्यामुळे गेली अनेक वर्षं लाखो तरुण-तरुणींच्या आयुष्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान होत आहे. साहजिकच 'एमपीएससी' परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये संताप खदखदत आहे. स्वप्नीलच्या दुर्दैवी घटनेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग योग्य तो बोध घेईल आणि आपला 'दिरंगाईचा खेळ' कायमचा थांबवेल, हीच अपेक्षा, असे अमित ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते.
बकवास लोक आपल्या नशिबात आली आहेत – अभिनेता प्रविण तरडे
या जगात फक्त राजकारण्यांनी जगायचं का? त्यांच्या पोरा-बायकांनी, त्यांच्या नातेवाईकांनी जगायचं? आणि सामान्य माणसांनी मरायचं... त्यामुळे आपण यांच्याबदद्ल गोड-गोड बोलणं बंद केलं पाहिजे. नाहीतर शेतकरी मरणार, एमपीएसी करणारे मरणार, कला क्षेत्रातली माणसं मरणार, मग जगणार कोण राजकरणासंबधातली लोकं? इतकी बकवास लोक आपल्या नशिबात आलेली आहेत. कुणालाही कसलच ताळतंत्र नाहीये. स्वत:च्या राजकारणात ते रमलेले आहेत. सहा महिन्यांनी हा पक्ष त्या पक्षाशी युती करतोय. तो पक्ष त्या पक्षाशी युती करतोय. कार्यकर्ता याच्यासाठी भांडतोय, त्याच्यासाठी भांडतोय. एकमेकांची डोकी फोडतो. सगळे एका माळेचे मणी आहेत. मी कुठल्याही एका पक्षावर किंवा एका राजकारण्यावर टिका करत नाहीये. मी सगळ्यांवर टिका करतोय, असं परखड मत प्रवीण तरडे यांनी व्यक्त केलं आहे.