नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षपदावरून दिल्लीत पक्षातंर्गत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. स्वत: राहुल गांधी जर अध्यक्ष होण्यास तयार नसतील किंवा त्यांच्या नावावर कोणी आक्षेप घेतला असेल तर प्रियांका गांधी यांना कॉंग्रेसची जबाबदारी सोपविण्याची संमती दिली जाण्याची शक्यता आहे. कारण आत्तापर्यंत कोणत्याही बिगर गांधी नावावर सहमती बनली नाही, जे सर्वमान्य असेल.
शनिवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमवेत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णायक बैठकीत राहुल यांनी नकार दिल्यानंतर प्रियांकाच्या नावाला पर्याय म्हणून मान्य केले जाऊ शकते. या सूत्रानुसार दहा जनपथ कुटुंब आणि पक्षातील रणनीतिकार यांच्यात सामंजस्य निर्माण झाले आहे. प्रियंका गांधीदेखील या संपूर्ण घडामोडीत सर्वाधिक सक्रिय भूमिका साकारत आहेत. त्यांच्या पुढाकारानेच २३ जणांच्या प्रमुख नेत्यांची आणि सोनिया गांधी यांची बैठक शक्य झाली आहे. कमलनाथ आणि प्रियांका गांधी यांच्याव्यतिरिक्त सोनिया गांधी यांच्यासमवेत राहुल गांधीही या बैठकीला उपस्थित राहू शकतात. तर २३ जणांमधील काही प्रमुख नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल हे असतील. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हेदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे.
ही माहिती देताना कॉंग्रेसमधील प्रियंकाच्या निकटवर्ती सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी आणि त्यांच्या टीमच्या कार्यशैलीबाबत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा आक्षेप आणि प्रश्न ज्याप्रकारे आहेत, त्यामुळे कमलनाथ यांना राहुलच्या नावावर सर्वांची सहमती मिळवण्यास कठीण जात आहे. तर सोनिया गांधींनी कमलनाथ यांच्याकडे कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी राहुल यांच्या नावावर सहमतीची जबाबदारी सोपविली आहे.
परंतु कमलनाथ यांनी आतापर्यंत ज्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे त्यापैकी बहुतेकांनी राहुल यांच्या नावाबद्दल स्पष्टपणे मतभेद व्यक्त केले आहेत. काही नेत्यांनी अगदी सरळ असं म्हटले आहे की, गांधी घराण्याशिवाय आपण कॉंग्रेसची कल्पनाही करू शकत नाही, पण राहुलऐवजी प्रियांकाला पक्षाचं नेतृत्व सोपवलं तर बरं होईल. कॉंग्रेसच्या तिकिटावर दोनदा लोकसभा निवडणूक लढविणारे आणि प्रियंका गांधी यांच्या सल्लागार मंडळाचे सदस्य असलेल्या आचार्य प्रमोद कृष्णम यांनी प्रियंका गांधी यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष करण्यासाठी यावर्षी २२ नोव्हेंबर रोजी ट्विट केले होते. आपल्या ट्वीटमध्ये आचार्य प्रमोद कृष्णम यांनी लिहिले होते की, देशातील सद्य राजकीय परिस्थिती लक्षात घेता कोट्यवधी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे की पक्षाची कमांड प्रियंका गांधी यांच्याकडे सोपविली पाहिजे, जेणेकरून संपूर्ण देशात मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणांविरुद्ध आंदोलन उभं राहू शकतं.
कॉंग्रेसमध्ये प्रियांकाला अध्यक्ष बनविण्याची मागणी यापूर्वीही बर्याचदा उठली होती, कॉंग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंकाच्या पुढाकाराने सोनिया गांधी यांची आणि २३ जणांच्या गटातील नेत्यांची बैठक होत आहे. अलीकडेच कमलनाथ यांनी दिल्लीत येऊन प्रियंका गांधी यांची भेट घेतली त्यात इतर ज्येष्ठ नेत्यांच्या चिंतेविषयी चर्चा केली, तेव्हा प्रियंका यांनी सर्व नेते कॉंग्रेसच्या अध्यक्षांना भेटत का नाही, असा सवाल केला. माध्यमांमध्ये पत्र लिहिणे किंवा वक्तव्य करणे यापेक्षा या सर्व नेत्यांनी थेट कॉंग्रेस अध्यक्षांशी बोलले पाहिजे. यामुळे दोघांमधील संवादातील दरी संपेल आणि कोणतीही समस्या सुटेल असं म्हटलं होतं. कमलनाथ यांना ही कल्पना पटली. त्यानंतर प्रियंकाने सोनिया आणि कमलनाथ यांचं इंटरकॉमवर बोलणं करून दिलं, ज्यामध्ये अशी बैठक झाली पाहिजे यावर एकमत झाले. या संभाषणात सोनिया यांनीही कमलनाथ यांना राहुल यांच्या नावातील नेत्यांमध्ये सहमती निर्माण करण्याची जबाबदारी सोपविली.
त्यामुळे जर राहुल गांधी यांच्याऐवजी प्रियंका गांधी आल्या तर गांधी घराण्याचं अस्तित्वही वाचेल आणि पक्षाला नवी दिशाही मिळेल, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या एका निष्ठावंताने सांगितले की, जर प्रियंका गांधी समोर येऊन नेतृत्व करत असतील, तर फक्त काँग्रेस कार्यकर्ते नव्हे तर सर्वसामान्य जनतेलाही काँग्रेसबद्दल नवीन विश्वास आणि उत्साह निर्माण होईल.