सदानंद नाईक
उल्हासनगर : दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याच्या नूतनीकरण कार्यक्रमासाठी आलेले पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रिपाइं ऐक्य शक्य असून त्यासाठी मोठ्या मनाने रामदास आठवले यांना प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी करावी लागेल. अशी प्रतिक्रिया दिली. आम्ही विना शर्त ऐक्यासाठी तयार असल्याचेही कवाडे यावेळी म्हणाले.
उल्हासनगर महापालिका पीआरपी पक्षाचे गटनेते प्रमोद टाले यांच्या गटनेता निधीतून गुरुनानक शाळा चौकातील दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याचे सौदर्यकरण व नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरण कार्यक्रमाचे उदघाटन रविवारी रात्री ८ वाजता पीआरपी पक्षाचे अध्यक्ष आमदार प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार बालाजी किणीकर, महापौर लिलाबाई अशान, विरोधी पक्षनेते राजेश वानखडे, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदेव कवाडे, राष्ट्रवादी पक्षाच्या शहराध्यक्षा पंचम कलानी, माजी नगरसेवक शांताराम निकम, प्रशांत धांडे यांच्यासह पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थितीत होते. यावेळी कवाडे यांनी रिपाइं ऐक्य शक्य असल्याचे सांगून त्यासाठी रामदास आठवले यांना वरिष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांची मोठया मनाने व अहंकार बाजूला ठेवून मनधरणी करावी लागेल. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विना अट व शर्त आम्ही ऐक्यासाठी तयार असल्याचे कवाडे म्हणाले.
शहरातील अवैध व धोकादायक बांधकामे नियमित करण्याचा राज्य समिती अहवाल सरकारने लवकर घोषित करून लाखो नागरिकांना दिलासा द्यावा. असे कवाडे यांनी सुचविले. तर दर पाच मिनिटांनी रंग बदलणाऱ्या वालधुनी नदीचा पुनर्विकास, डम्पिंग प्रश्न निकाली काढणे, महापालिकेतील अनुकंपातत्त्वावरील भरती, पदोन्नतीचा प्रश्न, दलितवस्ती निधीतील कामांना हिरवा कंदील आदी अनेक विकास कामाबाबत कवाडे यांनी प्रथमच उहापोह केला. कार्यक्रम वेळी दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याची व चौकाचे नूतनीकरण व सौन्दर्यकरण करून दुरावस्था दूर केल्याची माहिती यावेळी पक्षाचे गटनेते प्रमोद टाले यांनी दिली. तर बालाजी किणीकर यांनी महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीत कायम राहून विकास कामे सोबत करू. असे आश्वासन कवाडे यांना दिले.
कवाडे यांचा निवडणूकीत स्वबळाचा नारा
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून आम्ही आघाडीचा घटक पक्ष आहो. मात्र येणाऱ्या जिल्हापरिषद व महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने पक्षाला सन्मानजनक जागा सोडल्या नाहीतर, पक्ष राज्यात स्वबळावर निवडणुका लढणार. असे स्पष्ट संकेत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिला.