‘’तो अहवाल प्रसिद्ध होताक्षणी ठाकरे सरकार पडणार’’ भाजपाच्या बड्या नेत्याचा दावा
By बाळकृष्ण परब | Published: November 7, 2020 01:12 PM2020-11-07T13:12:38+5:302020-11-07T13:15:49+5:30
Uddhav Thackeray News : अर्णव गोस्वामींना झालेल्या अटकेवरून सध्या शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका बड्या नेत्याने पुन्हा एकदा ठाकरे सरकारबाबत मोठा दावा केला आहे.
नवी दिल्ली - राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये सध्या कमालीची कटुता आलेली आहे. अर्णव गोस्वामींना झालेल्या अटकेवरून दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका बड्या नेत्याने पुन्हा एकदा ठाकरे सरकारबाबत मोठा दावा केला आहे. माजी पंतप्रधान नरसिंहा राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्थापन केलेल्या एनएन वोहरा समितीने दिलेला अहवाल प्रसिद्ध केल्यास लगेचच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पडेल असा दावा भाजपा नेते अश्विनी उपाध्याय यांनी केला आहे. तसेच हा अहवाल तातडीने प्रसिद्ध केला जावा, अशी मागणी उपाध्याय यांनी केली आहे.
एनएन वोहरा यांच्या नेतृत्वाखालील समितीने एक १०० पानांचा अहवाल तयार केला होता. त्या अहवालामध्ये दाऊद इब्राहिमसारख्या कुख्यात गुन्हेगारांशी राजकीय नेत्यांच्या आणि नोकरशहांच्या असलेल्या संबंधांबाबत खळबळजनक माहिती होती. या अहवालातील केवळ १२ पानेच प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, या नेत्यांची माहिती कधी प्रसिद्ध केली जाईल, अशी विचारणा उपाध्याय यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पीएमओला टॅग करत उपाध्याय यांनी ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, सर्वोच्च न्यायालयाने वोहरा समितीच्या अहवालावर कारवाई करण्याची सूचना केंद्र सरकारला दिली होती. मात्र २३ वर्षे होत आली तरी आतापर्यंत वोहरा समितीच्या अहवालावर कुठलीही कारवाई झाली नाही. तसेच हा अहवाल सार्वजनिकही करण्यात आलेला नाही.
20.3.1997 को @DinTri की PIL [WP(C) 664 / 1995] पर सुप्रीमकोर्ट ने केंद्र सरकार को वोहरा कमेटी रिपोर्ट पर कार्यवाही करने का निर्देश दिया था
— Ashwini Upadhyay (@AshwiniBJP) November 7, 2020
23साल बीत गए लेकिन वोहरा कमेटी रिपोर्ट पर न तो कोई कार्यवाही हुई और न तो इसे सार्वजनिक किया गया@HMOIndia@AmitShah@PMOIndia@narendramodi
काय आहे वोहरा समितीचा अहवाल
१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर नरसिंहराव सरकारने एनएन वोहरा यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती. या समितीचे अध्यक्षपद तत्कालीन गृहसचिव एनएन वोहरा यांच्याकडे होते. तसेच या समितीमध्ये रॉ आणि आयबीचे सचिव, सीबीआयचे संचालक आणि गृहमंत्रालयाच्या सचिवांचाही समावेश होता. अनेक नेते आणि नोकरशहांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याची खळबळजनक माहिती या अहवालातून सरकारला देण्यात आली होती. हा अहवाल पूर्णपे प्रसिद्ध करण्यात आला नाही. मात्र १९९५ मध्ये १०० पानी अहलवालामधील १२ पाने प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामधून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे मोठे अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी असलेल्या संबंधांबाबत सूतोवाच करण्यात आले होते.