Gayatri Shingne Rajendra Shingane: सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी अशी लढाई बघायला मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले राजेंद्र शिंगणे परतीच्या मार्गावर असल्याची कुणकुण लागताच गायत्री शिंगणे यांनी बंडाचे संकेत दिले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही, तर अपक्ष लढणार अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
राजेंद्र शिंगणे शरद पवारांच्या पक्षात जाणार अशी चर्चा सुरूये. याबद्दल गायत्री शिंगणे म्हणाल्या, "अशा अफवा बऱ्याच दिवसांपासून चालू होत्या की, त्यांनी घरवापसीचे संकेत दिले आहेत. कालच्या सभेतही ते बोलले होते की, माझा १६-१७ तारखेला प्रवेश आहे. पण, आम्ही अजूनही शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवून आहोत", अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
"प्रवेशासाठी शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल नाही"
"मला असं वाटतं की, पवार साहेबांकडून अजूनही ग्रीन सिग्नल आलेला नाही. आम्ही एक निष्ठेने पवार साहेबांसोबत राहून काम केलं आहे. अजूनही एकनिष्ठ राहणार आहे. जर अशा काही घडामोडी झाल्या, तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू", असे गायत्री शिंगणे म्हणाल्या.
ठपवार साहेबांनी सांगितलेलं आहे की एकनिष्ठांना संधी देऊ. पण, जर काही घडामोडी घडल्या, तरी मी लढेन. शंभर टक्के आम्ही लढणारच आहे. कारण एवढे कष्ट घेऊन घरोघरी तुतारी पोहोचवण्याचं काम मी केलंय. ठीक आहे. पवार साहेब काय ठरवतात, ते बघू. उलट्या सुलट्या घडामोडी झाल्या, तरी मी ठाम आहे. शंभर टक्के लढणार म्हणजे लढणारच!", अशी स्पष्ट भूमिका गायत्री शिंगणे यांनी मांडली आहे.
अपक्ष म्हणून लढणार -गायत्री शिंगणे
"शंभर टक्के अपक्ष म्हणून लढणारच. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रवेशाला आणि उमेदवारीला शंभर टक्के विरोध आहे. कारण पाच वर्षांपासून मी काम करतेय. पक्ष फुटल्यानंतरही एकनिष्ठेने काम केलं. बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे काय हाल होते, सगळ्यांना माहिती आहे", असे सांगत गायत्री शिंगणे यांनी बंडाचे संकेत दिले.