कोल्हापूर – देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीनं कधीही टरबुज्या म्हटलं नाही, इतर कुणीही म्हटलेलं मी ऐकलं नाही, परंतु चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा असा होतो, म्हणून त्यांनी या गोष्टीचा राग मानू नये असा चिमटा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला होता, आज कोल्हापुरात चंद्रकांतदादांनी याचा चांगलाच समाचार घेतला.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझ्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा होतो, म्हणून चंपा बोलणं अयोग्य आहे, उद्या जयंत पाटील यांचा जपा, शरद पवारांचा शपा किंवा उद्धव ठाकरेंचा उठा असा उल्लेख व्हायला लागला, तर ते सुसंस्कृत राजकारणात बसणारं नाही, त्यामुळे असे प्रकार टाळले पाहिजेत अशी नाराजी चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवली.
तसेच आमच्या काळात रस्त्यांचे स्वरूप बदलले. अनेक विकास कामे मार्गी लागली. मात्र मंत्री हसन मुश्रीफ व जयंतराव पाटील असताना हे दिसत नाही. त्यांना मला शिव्या घातल्या शिवाय वेळ जात नाही. त्यांच्या भाषणाची सुरुवात, मध्य व शेवट माझ्या नावाने होतो. त्यांना वाटते मला शिव्या दिल्या की शरद पवारांकडे आपले महत्व वाढते. शरद पवार पण किती हुशार आहेत ते त्यांनाच माहीत. मी त्यांच्यावर पीएचडी करतो आहे असा टोला चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी हाणला.
दरम्यान, मराठा आरक्षण कोणी दिले व घालविले हे लोकांना माहिती आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात टिकवला, सुप्रित कोर्टात एक वर्ष हा प्रश्न टिकवून धरला होता. पण, महाआघाडीचे सरकार आले आणि आरक्षण टिकले नाही हे कुणी केले हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत आमची भूमिका काय होती हे मुश्रीफ, अजित पवार व जयंत पाटील यांनी सांगायची गरज नाही असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. पुणे पदवीधर मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळेच या मतदार संघात महाआघाडीने विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. यासाठी मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री जयंत पाटील यांनी कंबर कसली आहे. दिवसातून चारवेळा माझ्या नावाचा जप या लोकांनी सुरू ठेवला असून माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना रात्री झोप येत नाही असा टोला राष्ट्रवादी नेत्यांना लगावला.
काय म्हणाले होते जयंत पाटील?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. तसेच देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या तर मला ‘चंपा’ संबोधतात ते कसे काय चालते? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता, त्यावर जयंत पाटील म्हणाले की, आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना कधीही टरबुज्या म्हटलेले नाही. पण चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग मानून घेऊ नये असं चिमटा जयंत पाटलांनी काढला होता.