कल्याण - कल्याणडोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता राजकीय पक्षांमध्ये विविध मुद्द्यावरून चांगलाच कलगीतुरा रंगलेला दिसतोय. आता आम आदमी पक्षानेही आपली भूमिका मांडली असून आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदारांनी आम्हाला सत्ता दिल्यास दिल्लीप्रमाणे नागरी सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आपकडून देण्यात आले आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेत पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांची मेळावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी हे आश्वासन दिले आहे.
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने लोककल्याणकारी व्यवस्था कशी असावी याच मॉडेल सर्वच राजकीय पक्षांपुढे मांडलं आहे. दिल्ली सरकारने राबविलेल्या असंख्य लोकहिताच्या योजनांच कौतुक होत आहे. दिल्लीतील सरकारी शाळांची तुलना खासगी शाळांसोबत केली जात आहे. त्याचबरोबर घरपोच दाखले- प्रमाणपत्रे, २०० युनिट मोफत वीज, मोफत पाणी अशा सुविधांची गेल्या १० वर्षांपासून अंमलबजावणी केली जात असल्याचेही राचुरे यावेळी म्हणाले. आजपर्यंत देशात अशा कोणत्याही योजना राबविण्याची कल्पकता आणि धाडस दाखवले नसून लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवल्यास कल्याण डोंबिवलीतही दिल्ली मॉडेल राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे.
महापालिकेची परिवहन सेवा तोट्यातून फायद्यात चालवून प्रवाशांना वेळापत्रकानुसार बससेवा पुरविणे, फेरीवाल्यांना दोन वर्षांत फेरीवाला धोरणानुसार टप्प्याटप्प्याने जागा निर्धारित करून देणे, खड्डेमुक्त आणि सुरक्षित दर्जेदार रस्ते, महापालिकेतील टक्केवारीने बरबटलेली भ्रष्टाचारी साखळी मोडीत काढणे, महिला - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास, मोफत पाणी या सुविधा आपकडून नागरिकांना दिल्या जातील असे सांगण्यात आले आहे.