नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. भाजपचे जवळपास १४ माजी नगरसेवक शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे भाजप नेते गणेश नाईकही आक्रमक झाले आहेत. तुम्ही आमचे २ फोडले तर आम्ही तुमचे ४ फोडणार व तुम्ही आमचे ८ फोडले तर आम्ही तुमचे १६ फोडू असा इशारा दिला आहे. यामुळे पुढील काळात फोडाफोडीचे सत्र सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. कोणत्याही स्थितीमध्ये सत्तांतर करण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला असून भाजपाने सत्ता टिकविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला गळती लागली आहे. आतापर्यंत भाजपमधील १४ माजी नगरसेवकांनी पक्षांतर केले असून अजून अनेक जण पक्षांतराच्या मार्गावर आहेत. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच आ. गणेश नाईक यांच्यापुढे सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आतापर्यंत एकहाती वर्चस्व असलेल्या झोपडपट्टी परिसरावरील पकड ढिली झाली आहे. शहरी विकसित परिसरामध्येही पक्षाला गळती लागली आहे. ज्यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रह धरला त्यांनीही आता भाजप सोडली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्व ताकदीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.पक्षात सुरु झालेली गळती थांबविण्यासाठी आता आ. गणेश नाईक हेही आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी नेरुळ येथे प्रीती चंद्रशेखर भोपी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आ. मंदा म्हात्रे, माजी महापौर जयवंत सुतार, संजीव नाईक,के.एन. म्हात्रे, धनाजी ठाकूर, निरंत पाटील, गिरीश म्हात्रे उपस्थित होते. यावेळी नाईक यांनी विराेधकांवर टीका केली. तुम्ही आमचे दोन नगरसेवक फोडले तर आम्ही तुमचे चार नगरसेवक फोडू, तुम्ही चार फोडले तर आम्ही आठ फोडू व तुम्ही ८ फाेडले तर आम्ही १६ फोडू असा इशारा दिला आहे. मी एकदा ठरवले की, ते करतोच. असेही नाईक यांनी स्पष्ट केले. फोडा - फोडीच्या राजकारणावर नाईक पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलल्यामुळे पुढील काळात अजून फोडाफोडी होणार असे बोलले जात आहे.निवडणुकीविषयी चुरस वाढलीमहाविकास आघाडी व भाजपमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. यामुळे आता भाजप काेणत्या पक्षात फूट पाडणार याविषयी सर्वांना उत्सूकता लागली आहे. सर्वाधिक फूट भाजपमध्ये पडणार की महाविकास आघाडी याविषयीही चर्चा सुरु झाली आहे.
तुम्ही आमचे दोन फोडले तर आम्ही तुमचे चार फोडणार; गणेश नाईकांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 2:30 AM