मुंबई - देवासारख्या नेतृत्वावर कोण टीका करत असेल तर सहन करणार नाही, रागाने मारले तर का मारलं ते बघा, अधिकाऱ्याने आपल्या मर्यादेत राहायला हवं. आमच्या नेतृत्वाचा अपमान करायचा मग त्यावर कार्यकर्त्यांचा संताप व्यक्त केला ती गुंडगिरी कशी? कारण नसताना खंडणीसाठी मारहाण केलीय का? त्याने जे कार्टून फॉरवर्ड केले त्यावर कार्यकर्त्याचा संताप होता. अधिकाऱ्याने मर्यादा सोडली तर कार्यकर्त्यांनीही मर्यादा सोडली अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या मारहाणीचं समर्थन केले आहे.
याबाबत अनिल परब म्हणाले की, मुन्ना यादव ज्याला माजी मुख्यमंत्री घेऊन फिरत होते, तो कोण होता? शिवसेना ज्वलंत सेना आहे. सेनेला धगधगता इतिहास आहे. सत्तेत बसलो म्हणून कुणीही टपली मारायची, खालच्या भाषेत टीका करायची, घाणेरड्या पोस्ट टाकायचा, सत्तेत बसलो म्हणून काही करायचं नाही, जो कुणी बोलेल त्याचं ऐकून घ्यायचं. हाताची घडी घालून बसायचं का? कायदेशीर कारवाई केली तर सत्तेचा दुरुपयोग केला असा आरोप करायचा आणि मारलं तर सरकारचा दुरुपयोग केला जातोय आरोप करायचं. संयम आणि मर्यादा दोन्ही बाजूने पाळायला हव्यात. टीका करणे हा विरोधकांचा अधिकार आहे. कुणीही मर्यादा सोडली तर शिवसैनिक मर्यादा सोडणारच असं त्यांनी सांगितले आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान घराच्या बाहेर कधी पडले?
मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडत नाही असा आरोप करता मग पंतप्रधान घराच्या बाहेर कधी पडले, कोणत्या राज्यात फिरले. प्रमुख पदावरील व्यक्ती अधिकाऱ्यांशी बोलत असतात. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सगळ्या जिल्ह्यातील ज्याठिकाणी पोहचता येत नाही तेथील समस्या सोडवता येतात. ज्या व्यक्तिला काम करायचं त्याने कुठूनही काम केले तरी जमतं. इतकं होतं तर मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत यायचं होतं असा टोला अनिल परब यांनी भाजपाला लगावला आहे.
तसेच राज्यातील प्रत्येक छोट्या घटकांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद आहे. विरोधकांना काही काम नाही, सरकारला बदनाम करणे, सरकारवर टीका करणे एवढचं काम नाही. देशभरात पूर आला तिथे पंतप्रधान गेलेत का? विदर्भाच्या पूरात सरकारचे ४ मंत्री तळ ठोकून आहेत, त्यांच्याशी वारंवार मुख्यमंत्र्यांचा संवाद आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक ठिकाणी गेलेच पाहिजे हा नियम नाही, त्याची गरज नाही. तिथे मदत पोहचणे हे काम सरकार करत आहे असं त्यांनी सांगितले.
कंगनाला राज्यपालांनी भेट द्यावी हे आश्चर्य
कंगनाच्या घरावर कारवाई झाली ती कायदेशीर झाली. कंगनाने अनाधिकृत बांधकाम केले ते एका दिवसात झालं नाही, याबाबत चौकशी होऊन कारवाई करु. विरोधकांचा आक्षेप असेल तर बेकायदेशीर बांधकामांचा त्यांचे समर्थन आहे की नाही हे जाहीर करावं. त्यांनी जो पोपट पाळला त्याचे पंख कोणी ओढले त्याचा विरोधकांना राग आला असावा. अनाधिकृत बांधकाम तोडल्यानंतर राज्यपालांनी कंगनाला भेट द्यावी हे आश्चर्य. महानगरपालिकेने चुकीच्या गोष्टींना समर्थन करु नये त्यांनी कारवाई करावी याला शिवसेनेचा पाठिंबा आहे. आमचं बांधकाम अनाधिकृत असेल तर कारवाई करावी, विरोधकांचीही अनेक बांधकामे आहेत सगळ्यांवर कारवाई करावी. पण कंगनाच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाईवर विरोधकांचा पोटशूळ का आहे? गरीब लोकांच्या बेकायदेशीर कारवाईवर महापालिका कारवाई करते तेव्हा विरोधक कधी बोलले नाही, कंगनाचं ऑफिस तुटलं तर सगळेच बोलायला पुढे आले. विरोधक फक्त राजकारण करत आहे असा आरोप अनिल परब यांनी भाजपावर केला आहे.
ठाकरे ब्रँड कमकुवत केलं तर शिवसेना संपेल हा विरोधकांचा डाव
ठाकरे ब्रँड आधीपासून मजबूत आहे, ठाकरे ब्रँडला कधी आयुष्यात समस्या आली, सगळ्यांच्या डोळ्यात ठाकरे ब्रँडच खटकतोय, ठाकरे ब्रँड कमकुवत तर शिवसेना संपेल हा विरोधकांचा डाव आहे. ठाकरे नावाशिवाय महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही, ठाकरे ब्रँडच्या नावानं राज्यातील राजकारण फिरत आहे. ठाकरे ब्रँडला धक्का पोहचवण्यासाठी कुणाचीही ताकद नाही, कुवत नाही, ठाकरे ब्रँड हे फक्त नाव नाही तर आमच्यासाठी ते आदराचं विश्वासस्थान आहे असंही अनिल परब म्हणाले.