जयसिंगपूर : केवळ हुजरेगिरी करून आणि लाचारी करून पाशा पटेल यांनी पदे मिळवली आहेत. भाजपच्या नेत्यांना बरे वाटावे यासाठी राजू शेट्टी यांच्यावर टीका करून आणखी काही पदरात पडते का, यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे. मात्र, शेट्टींवर बोलण्याची आपली लायकी तरी आहे का, याचे किमान आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे. शेतकरी चळवळ सोडून भाजपच्या नेत्यांचे पाय चाटणाऱ्या पाशा पटेलांनी आम्हाला शेतकरी हिताचे सल्ले देऊ नयेत. कुणाला तरी बरे वाटावे म्हणून जर शेट्टींवर टीका कराल, तर पाशा पटेल यांना कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष शैलेश आडके यांनी दिला.
पटेल यांनी शेतकरी हितापेक्षा राजकीय लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा कळवळा असल्याचे नाटक केले. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असताना ऊसाचा उत्पादन खर्च कमी दाखवून शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान त्यांनी केले आहे. शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्तेला लाथ मारलेली आहे. सत्तेत असतानाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढा चालू ठेवला आहे. सत्तेची फळे चाखायची असती तर त्यांनीही भाजप नेत्यांची पाठराखण केली असती. पटेल यांचा आत्मा शेतकरी हिताचा आहे तर चळवळ सोडून भाजपमध्ये कशासाठी गेले, याचे उत्तर त्यांनी अगोदर द्यावे. यापुढे शेट्टींवर टीका कराल, तर तुम्हाला कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशाराच आडके यांनी दिला.