सच्चाई ऐकण्याची हिंमत असेल तर समोरासमोर या!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 06:42 AM2019-04-16T06:42:27+5:302019-04-16T06:52:21+5:30
५२६ कोटींचे राफेल विमान १६०० कोटींना का घेतले, असा थेट प्रश्न मी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला होता.
नांदेड : ५२६ कोटींचे राफेल विमान १६०० कोटींना का घेतले, असा थेट प्रश्न मी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला होता. त्यांनी दीड तास भाषण केले; मात्र राफेलसह एकाही प्रश्नाचे उत्तर ते देवू शकले नाहीत. एवढेच कशाला दीड तासात डोळ्यात डोळे घालून ते बोलू शकले नाहीत. माझे नरेंद्र मोदींना आताही थेट आव्हान आहे. सच्चाई ऐकण्याची हिंमत असेल, तर रेसकोर्ससह कुठल्याही ठिकाणी त्यांनी माझ्यासोबत चर्चेसाठी १५ मिनिटे समोरासमोर यावे. संपूर्ण देशासमोर त्यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही, असे थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले.
नांदेड येथे आयोजित विराट प्रचार सभेत ते बोलत होते. मंचावर काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण (नांदेड), सुभाष वानखेडे (हिंगोली) मच्छिंद्र कामंत (लातूर) यांच्यासह मुकुल वासनिक, मधुसुदन मिस्त्री, संपत कुमार, माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, कमलकिशोर कदम आदींची प्रमुख उपस्थिती होेती. खा. गांधी यांनी भाषणात भाजपवर जोरदार हल्ला चढवित प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले, विचारलेल्या प्रश्नांपासून मोदी पळ काढत आहेत. एवढेच कशाला प्रसार माध्यमांसमोर येऊन बोलण्याचे धाडसही त्यांच्यात नाही. कारण गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराशिवाय त्यांनी काहीच केले नसल्याची टीका राहुल यांनी केली.
ते म्हणाले, नोटाबंदी आणि गब्बरसिंग टॅक्समुळे आज करोडो लोक बेरोजगार झाले आहेत. मोदींच्या या मनमानी कारभारामुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली असून, मागील ४५ वर्षांत सर्वाधिक बेरोजगारीही त्यांच्याच काळात नोंदविली गेली आहे. मोदींनी देशासमोर येऊन यासाठी जाहीर माफी मागितली पाहिजे. मी पंतप्रधान नाही तर चौकीदार आहे असे मोदी ओरडत आहेत. हे खरे आहे. मागील पाच वर्षांत मोदींनी केवळ अनिल अंबानींचीच चौकीदारी केली आहे. मोदींना आता पंतप्रधान करु नका तर त्यांना चौकीदार म्हणूनच ठेवा, असे आवाहन राहुल यांनी केले. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. मोदींनी लोकांच्या खिशातील पैसे काढून घेतले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल खरेदी बंद केली. पर्यायाने कारखाने बंद झाले आणि त्यातून बेरोजगारी वाढली. यावर मात करण्यासाठी आम्ही आता देशातील आर्थिक दुर्बल ५ कोटी लोकांच्या खात्यावर दरवर्षी ७२ हजार रुपये टाकणार असून याचा फायदा देशातील २५ कोटी लोकांना होईल, असे राहुल यांनी स्पष्ट केले.
मोदींकडून १५ लाखांची फसवणूक, आमची ३ लाख ६० हजारांची हमी
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशातील गरिबांसाठी न्याय योजना जाहीर केली आहे. मोदींनी प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकण्याची घोषणा केली होती. या घोषणेसारखी न्याय योजनेची घोषणा फसवणूक करणारी नाहीे. मोदींनी १५ उद्योगपतींचे हजारो कोटी रुपये माफ केले. तुम्ही उद्योगपतींचे कर्ज माफ करु शकता? मग देशातील इमानदार नागरिकांना दिलासा का देवू शकत नाही? न्याय योजनेच्या अनुषंगाने मी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा केली. जागतिक स्तरावरच्या अर्थतज्ज्ञांचेही सल्ले घेतले. त्यानंतरच दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ शकतो हे ठरविले. म्हणजेच गरिबाला पाच वर्षांत ३ लाख ६० हजार रुपये दिले जातील. ही केवळ घोषणा नाही तर न्याय योजनेच्या अंमलबजावणीची तुम्हाला मी गॅरंटी देतो, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी विश्वास दिला.
महाराष्टÑाच्या डीएनएमध्ये काँग्रेस
महाराष्टÑाचा इतिहास सहिष्णुतेचा आणि बंधुभावाचा आहे. या प्रदेशाने नेहमी सद्भावनेचा, प्रेमाचा संदेश दिला आहे. या राज्याने कधीही द्वेषाचा आधार घेतला नाही. येणारे सरकार हे एका व्यक्तीचे असणार नाही तर पूर्ण भारतीयांचे असेल. असे सांगत महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्टÑवादीच्या विजयाबाबत मी निश्चिंत आहे. कारण महाराष्टÑाच्या डीएनएमध्येच काँग्रेस असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
>राहूल गांधी यांनी
मोदींना केलेले प्रश्न
मागील निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दरवर्षी २ कोटी युवकांना रोजगार देण्याचा शब्द दिला होता. या निवडणुकीत जाहीरनाम्यातून रोजगाराचा मुद्दाच भाजपने वगळला आहे. भाजपने असे का केले?
५२६ कोटींचे राफेल विमान
१६०० कोटींना खरेदी करीत आहात. हिंदुस्थान एरोनॅटिक लि. ही कंपनी भारतात दर्जेदार विमानाचे उत्पादन करु शकते. मात्र त्यानंतरही विमान बनविण्याचा कसलाही अनुभव नसताना अनिल अंबानींच्या कंपनीला विमानाचे कंत्राट द्या, असे फ्रान्सच्या राष्टÑपतींना का सांगितले?
५० हजार रुपये उत्पन्न असलेल्या
अमित शहा यांच्या पुत्राने महिन्यात
८० कोटी कुठून मिळविले?
अरुण जेटली यांच्या मुलीच्या खात्यावर मेहुल चोक्सी याने
पैसे का टाकले?
नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी
या सर्व चोरांची नावे मोदीच का आहेत?