पुणे :'जगायचं असेल तर भाजपाला मतदान करू नका' असे सांगत पुण्यातील मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आश्चर्य म्हणजे महिला शहराध्यक्षा स्वतः रिक्षा चालवत कार्यकर्त्यांसह हा प्रचार करत आहेत.
मनसे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात नसला तरी राज ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात सभा घेत सध्या महाराष्ट्र गाजवला आहे. एकही उमेदवार उभा नसताना त्यांच्या या सभांची सोशल मीडियावरून खिल्ली उडवण्यात येत असली तरी त्यांच्या या सभांना होणारी प्रचंड गर्दीही ठिकठिकाणी लक्षवेधी ठरत आहे. ठाकरे यांनी अजून तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत थेट आघाडीत सहभाग घेतला नसला तरी त्यांच्या या सभांचा फायदा मात्र आघाडीला होण्याची शक्यता आहे. अशावेळी कार्यकर्त्यांनीही ठाकरे यांची भूमिका लक्षात घेत भाजप विरोधी प्रचाराला सुरुवात केली आहे.
पुण्यातील महिला शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे पाटील यांनी तर स्वतः रिक्षा घेऊन फिरायला सुरुवात केली आहे. गर्दीच्या ठिकाणी फिरून त्या मतदारांना भाजपला मतदान न करण्याचं आवाहन करत आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत असून यातून पक्षाची भूमिकाही सामान्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आहे. या संदर्भात त्या लोकमतशी बोलताना म्हणाल्या की, 'आमचा सहभाग निवडणुकीत नसला तरी मतदाराच्या मनात आहे. २०१४साली पंतप्रधानांनी दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले नाही. आम्हाला आणि आमच्या पुढच्या पिढीसह सुखाने जगायचं आहे यासाठी आम्ही पुणेकरांना साद घालत आहोत. सध्या उन्हाळ्याच्या दिवसात ऊन खूप असल्याने आणि एकत्र फिरण्यासाठी रिक्षाची निवड केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.