नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. दिल्लीत सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना पीडितेचा मृत्यू झाला. यामुळे देशभर संताप व्यक्त होत आहे. विरोधकांनी उत्तर प्रदेशातील सरकारवर हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान आता गोंडा जिल्ह्यात तीन मुलींवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परसपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून तिन्ही मुली झोपेत असताना अज्ञाताने हा हल्ला केला. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून पोलीस अधिक तपास करत आहे.
झोपेत असताना मुलींवर अॅसिड फेकल्याचा घटनेवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी संतप्त झाल्या आहेत. योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत त्यांना यासाठी जबाबदार धरलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मंगळवारी (13 ऑक्टोबर) त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. योगी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या भूमिकेमुळे राज्यातील अपराध्यांचं मनोबल वाढीस लागल्याचं देखील प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. यासोबतच अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मुलींच्या वडिलांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा एक व्हिडीओही त्यांनी ट्विट केला आहे.
"उत्तर प्रदेश सरकारच्या भूमिकेमुळे राज्यातील अपराध्यांचं मनोबल वाढीस लागलं"
"17, 10 आणि 8 वर्षांच्या तीन मुली घरात झोपल्या होत्या. कोणीतरी घरात शिरलं आणि त्यांच्यावर अॅसिड हल्ला केला. महिलांवर अपराध करणाऱ्यांना योग्य ठरविणाऱ्या आणि त्यांचा बचाव करण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या भूमिकेमुळे राज्यातील अपराध्यांचं मनोबल वाढीस लागले आहे" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. गोंडा जिल्ह्यातील तीन बहिणींवर अॅसिड हल्ला करण्यात आला असून त्यामध्ये मोठी बहीण गंभीर जखमी झाली आहे. तर दोन बहिणी किरकोळ जखमी झाल्या आहेत. तिन्ही बहिणींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे.
तीन बहिणींवर अॅसिड हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू
मुलींच्या वडिलांनी प्रतिक्रिया देताना गावात कोणाशीही वैर नसून सर्वांशी सलोख्याचे संबंध असल्याचे सांगितलं आहे. गॅस सिलिंडरचा भडका उडून मुली होरपळल्या असतील असे सुरुवातीला वाटले. मात्र, एका तरुणाने अॅसिड फेकल्याचे मुलीने सांगितले. अॅसिड हल्ल्यानंतर मुलगी किंचाळली. पोलीस अधिकारी सुधीर सिंह यांनी अॅसिड हल्ल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. हल्ल्यातील पीडित मुलींमध्ये मोठी मुलगी 17 वर्षांची आहे. तर, इतर दोन मुली 12 आणि 8 वर्षांच्या आहेत. प्रियंका गांधी यांनी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून देखील योगी सरकारवर हल्लाबोल केला होता.
"आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोल टाकून का जाळण्यात आला?", प्रियंका गांधींचा सवाल
प्रियंका गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयामार्फत करण्याची तसेच हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. यासोबतच प्रियंका यांनी मुलीचा मृत्यू आणि तिच्या अंत्यसंस्कारासंबंधी काही प्रश्न विचारले. "संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे आणि त्यांना कोणत्याही मोठ्या पदाची जबाबदारी दिली जाऊ नये" असं प्रियंका यांनी म्हटलं होतं. "आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोल टाकून का जाळण्यात आला?, आमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे? आम्हाला धमकावलं का जातंय?. आम्ही माणुसकीच्या नात्याने चितेवरचे फूल आणले, पण आम्ही कसे मान्य करायचे की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता?" असं ट्विट प्रियंका यांनी केलं होतं.