लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : ‘सत्तेचा गैरवापर कसा करावा, हे भाजपला पूर्णपणे जमले आहे. त्यांनी गैरवापराच्या मर्यादा सोडल्या आहेत. मलाही दिवाळीच्या मुहुर्तावर इन्कमटॅक्सची नोटीस धाडली आहे. निवडणूक लढविताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील काही मुद्द्यांवर त्यांनी प्रश्न विचारले आहेत,’ अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
कऱ्हाड येथील त्यांच्या निवासस्थानी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, ‘बिहारची निवडणूक खरंतर जिंकता आली असती. मात्र, काँग्रेस पक्षाची तेथे अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली आहे. यावर मी भाष्य करणे उचित नाही. मात्र, यावर चर्चा लवकर व्हावी, अशी अपेक्षा आहे. ‘राज्यपाल कोश्यारी यांची भूमिका ही वादग्रस्त आहे. त्यांनी राज्यपाल म्हणून चौकटीत राहून काम करणे अपेक्षित आहे. मात्र, ते राजकारणच जास्त करताना दिसतात, असेही चव्हाण म्हणाले.
पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा, हाच उद्देशबिहार निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पुन्हा काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. याबाबत छेडले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘तसं काही नाही. बऱ्याच काँग्रेस नेत्यांची एकच इच्छा आहे की, पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला पाहिजे. राहुल गांधींनी ती जबाबदारी स्वीकारावी, अशीही आमची इच्छा आहे. आता राहुल गांधी त्याला राजी झाले नाहीत, तर प्रश्न आहे.’