मुंबई – ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने धाड टाकून कारवाई केली आहे, मात्र या कारवाईमुळे राज्यात राजकारण रंगलं आहे, एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या कारवाईला राजकीय सुडबुद्धीने केलेली कारवाई म्हटलं आहे, तर भाजपाने ईडीकडे काहीतरी पुरावे असल्याशिवाय कारवाई करणार नाही असं सांगत महाविकास आघाडीवरच निशाणा साधला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईला राजकीय द्वेषापोटी केलेली कारवाई असल्याचं सांगितलं आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर खळबळजनक आरोप केले आहेत, शिवसेना नेत्यांच्या भष्टाचाराची चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी संजय निरुपम यांनी केल्यानं महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे.
याबाबत संजय निरुपम म्हणाले की, ईडी, सीबीआयसारख्या संस्था राजकीय सुडबुद्धीने कारवाई करत असेल तर त्याची निंदा आहेच. परंतु शिवसेना नेत्यांनी मागील एक दोन दशकात इतका भ्रष्टाचार केलाय, इतकी अवैध संपत्ती जमा केलीय, त्यांची कुठे ना कुठे कोणी चौकशी करत असेल. ठाण्यातील प्रताप सरनाईक यांनी काय केलं माहिती नाही, मात्र शिवसेनेचे अनेक नेते असे आहेत ज्यांनी मोठमोठे भ्रष्टाचार केला आहे. त्याची चौकशी व्हायला हवी, या चौकशीला राजकीय द्वेष म्हणून फेटाळू शकत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी काँग्रेसला भ्रष्टाचारी म्हंटल, परंतु त्यांनी कदाचित आजूबाजूच्या शिवसेना नेत्यांना कधी पाहिलं नाही, महापालिका भ्रष्टाचारा अड्डा बनली आहे, या भ्रष्टाचाराची कमाई शिवसेना नेत्यांकडे जाते, याची चौकशी व्हायला हवीच, जर प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित नसेल तर ते फेटाळू शकत नाही असं सांगत निरुपमांनी शिवसेनेवर गंभीर आरोप लावले आहेत.
ठाण्याच्या आगीची झळ मुंबईपर्यंत पोहचण्याची भीती – भाजपा
ठाकरे सरकारचा काय प्रॉब्लेम आहे? ड्रगवाल्यांवर कारवाई केली तरी यांना त्रास होतो, हवाला आणि काळ पैसा प्रकरणी कारवाई केली तरी खाली वर होतात. मग कारवाई काय फक्त सॉफ्टटार्गेट असलेल्या पत्रकार आणि कंगनासारख्या अभिनेत्रीवर व्हावी का? ठाण्यात लागलेल्या आगीच्या झळा मुंबईपर्यंत पोहचतील ही भीती असावी काय? पण चिंता कशाला? कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही असं सांगत आमदार अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे.
सरनाईकांवरील कारवाई दुर्दैवी – काँग्रेस
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, ही कारवाई दुर्दैवी आणि आक्षेपार्ह आहे. केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असून भाजपाविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईडी, सीबीआय, सारख्या केंद्राच्या तपास यंत्रणाचा राजकीय कारणांसाठी वापर करुन विरोधकांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी कारवाई भाजपाशासित राज्यात झाल्याचे दिसत नाही असंही त्यांनी नमूद केले.
आम्हाला कोणाच्या बापाला घाबरत नाही; संजय राऊत आक्रमक
कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्या मंत्री, आमदारांच्या घराबाहेर ईडीनं कार्यालयं थाटली, तरीही आम्ही घाबरत नाही. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका त्यांनी केली.
सरनाईक यांच्यावर कार्यालयावर कारवाई हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकास आाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. मात्र अशा कारवाया करून पुढची २५ वर्षे भाजपाचे महाराष्ट्रात सरकार येणार नाही. तसेच सरकारी संस्थांनी राजकीय शाखा असल्यासारखे वागू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.