नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भारतचीन सीमावादावरून केंद्र सरकारला टार्गेट करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत, त्यांनी देशाची पवित्र जमीन चीनला सोपवली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे भारत चीन मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गुरुवारी संरक्षणमंत्र्यांनी त्यांचे म्हणणं संसदेत मांडले, यातील काही गोष्टी साफ झाल्या पाहिजेत, एप्रिलपूर्वी परिस्थिती सर्वसामान्य होईल असं सांगितलं जात होतं, परंतु आता संरक्षण मंत्र्यानी विधान केले आहे. भारताची जमीन फिंगर ४ पर्यंत होती, पण सरकारने आता फिंगर ३ वर सहमती का दिली? पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी भारताची जमीन चीनला का दिली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.(The Prime Minister is a Coward Says Rahul Gandhi)
त्याचसोबत राहुल गांधींनी देपसांग प्रकरणावरही भाष्य करत त्याठिकाणाहून चीन सैन्य मागे का हटलं नाही? त्यावरून हे स्पष्ट होतं की, भारताच्या पंतप्रधानांनी देशाच्या पवित्र जमिनीचा तुकडा चीनला सोपवला आहे. चीनसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुडघे टेकले आहेत. चीनचे सैन्य पँगोंग, देपसांग याठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या सैन्यांनी जाखमी घेतली आणि चीनशी मुकाबला केला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला आपली जमीन दिली. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत आणि देशाच्या सैन्याचा विश्वासघात करत आहेत असं दिसून येते असा घणाघात राहुल गांधींनी केंद्र सरकारवर केला.(India China Faceoff)
त्याचसोबत चीन मुद्द्यावर फक्त संरक्षण मंत्री का बोलत आहेत? स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासमोर सत्य सांगावे, भारताची जमीन फिंगर ४ पर्यंत होती, पण आता फिंगर ३ ते ४ जमीन चीनच्या ताब्यात गेली. भारताची पवित्र जमीन चीनने घेतली हे सत्य आहे. मोदींनी याचं उत्तर द्यावं, चीन आपल्या हद्दीत येऊन बसला आणि केंद्र सरकार त्याला काहीच बोलत नाही. नरेंद्र मोदी चीनविरोधात उभे राहू शकत नाहीत. भारताने कधीच हे सहन करू नये असं राहुल गांधी म्हणाले आहेत.