- हरिष गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या कार्यकाळातील दोन वर्षांतील मंत्रालयाच्या कामकाजाचा लेखाजोखा घेत २० कॅबिनेट मंत्री व स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे काम पूर्ण केले आहे. ही प्रक्रिया म्हणजे मोठे फेरबदल आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची नांदी समजली जाते. पंतप्रधान मंत्रिमंडळाचा येत्या काही आठवड्यांत फेरबदलासह विस्तार करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि अन्य मंत्र्यांसोबत बैठक घेतली. तथापि, विविध कारणांमुळे विदेश मंत्री एस. जयशंकर, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना या बैठकीत सहभागी होता आले नाही.पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनुसार २०१६ मध्ये अशाच प्रकारे विविध मंत्रालयाच्या कामिगरीचा आढावा घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांसह ५५ मंत्री असून आणखी २३ मंत्र्यांचा समावेश करुन विस्तार केला जाऊ शकतो.
मंत्रिमंडळातील स्थान टिकविण्यास कामिगरीचा आढावा महत्त्वपूर्ण आहे. कारण कॅबिनेट, राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेल्ल्या मंत्र्यांना नेमून दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी लेखी रुपरेखा दिली होती. सरकारमधील काही महत्त्वाच्या विभागाच्या कामगिरीचा आढावा घेण्यास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना निमंत्रित करण्यात आले होते.
काय घडू शकते...?जनता दल युनायटेडला दोन कॅबिनेट मंत्रीपदे दिली जातील. वायएसआर-काँग्रेसची मंत्रिमंडळात सामील होण्याची इच्छा नसली तरी वायएसआर-काँग्रेसला लोकसभेचे उपाध्यक्षपद देऊ केले जाईल, असे स्पष्ट आहे. प. बंगाल, आसाम आणि महाराष्ट्रालाही प्रतिनिधित्व दिले जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशला अधिक प्रतिनिधित्व दिले जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळात तीन कॅबिनेट मंत्र्यांसह उत्तर प्रदेशचे ८ मंत्री आहेत.
चिराग यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टीपाटना : लोक जनशक्ती पार्टीत फूट पडल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, आता चिराग पासवान यांनी या पाच खासदारांना पक्षातून निलंबित केले आहे. तर, आम्ही चिराग पासवान यांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटविले असल्याचे या गटाने सांगितले. त्यांच्या जागी सूरजभान सिंह यांना पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि निवडणूक अधिकारी बनविण्यात आले आहे. पाच दिवसांच्या आत कार्यकारिणीच्या बैठकीत नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे.