औरंगाबाद नव्हे, 'या' जिल्ह्याला संभाजी महाराजांचं नाव द्या; प्रकाश आंबेडकरांची मागणी
By कुणाल गवाणकर | Published: January 4, 2021 08:22 PM2021-01-04T20:22:27+5:302021-01-04T20:27:21+5:30
औरंगाबाद शहराला ऐतिहासिक महत्त्व, ते तसंच कायम राहावं; प्रकाश आंबेडकरांची भूमिका
मुंबई: औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत आहे. औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर असं करण्यासाठी शिवसेनेनं पावलं उचलताच त्याला सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसकडूनच विरोध झाला. महाविकास आघाडी सरकारमधील या मतभेदांवरून भाजपनं शिवसेनेला लक्ष्य केलं. औरंगाबादचं नाव बदलण्यासाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. आता या सगळ्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे.
औरंगाबाद नव्हे, तर पुणे जिल्ह्याचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली. यावेळी त्यांनी दोन्ही जिल्ह्याला असलेल्या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ दिला. औरंगाबादचं नाव बदलून ते संभाजी नगर करण्यास प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप नोंदवला. 'औरंगाबाद ऐवजी पुण्याला संभाजी महाराजांचं नाव द्यायला हवं. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. मुघलांच्या काळात औरंगाबाद दुसरी राजधानी होती. औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे आणि त्याचं ऐतिहासिक महत्त्व कायम राहायला हवं,' असं आंबेडकर म्हणाले.
पुणे आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं असलेलं नातंदेखील त्यांनी उलगडून सांगितलं. 'औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा थेट असा फारसा संबंध नाही. उलट संभाजी महाराज आणि पुण्याचं नातं आहे. पुणे जिल्ह्यात संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील वडूज गावात त्यांची समाधी आहे. त्यामुळे संभाजी महाराजांचं स्मरण राहावं, असं वाटत असेल तर योग्य भूमी पुणे शहर आणि जिल्हा आहे. त्यामुळे पुण्याला संभाजी महाराजांचं नाव दिलं तर अधिक संयुक्तिक होईल,' असं त्यांना सांगितलं. पाच वर्ष सरकारमध्ये असताना भाजपा-शिवसेनेनं औरंगाबाद शहराचं नाव का बदललं नाही, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.