नवी दिल्ली : विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांशी माझे जिव्हाळ््याचे संंबंध आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दरवर्षी स्वत: निवडलेले दोन कुर्ते व बंगाली मिठाई मला भेट म्हणून पाठवतात, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सुखद धक्का दिला.नरेंद्र मोदींच्या टीकाकारांमध्ये ममता बॅनर्जी या कायम अग्रस्थानी असतात. भाजपविरोधात ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांची महाआघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. या पार्श्वभूमीवर अभिनेता अक्षयकुमार याने घेतलेल्या बिगरराजकीय मुलाखतीत पंतप्रधानांनी हे वक्तव्य करून सगळ््यांना सुखद धक्का दिला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना याही मला त्या देशातील मिठाई आवर्जून पाठवतात असेही त्यांनी सांगितले.या मुलाखतीत मोदी म्हणाले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्याशी माझा दोस्ताना आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांबरोबर मी वर्षातून एकदा किंवा दोनदा एकत्र भोजनही घेतो. जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्रीही नव्हतो तेव्हा काही कामानिमित्त संसदेत गेलो होतो. त्यावेळी गुलाम नबी आझादांशी खूप गप्पा मारताना बघून पत्रकारांनी मला विचारले ‘संघाचे असूनही तुमची आझाद यांच्याशी मैत्री कशी काय?' यावर आझाद यांनी सर्व पक्षांतील नेत्यांचे परस्परांशी कौटुंबिक जिव्हाळ््याचे संबंध असतात ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, असे उत्तर दिले होते.मी पंतप्रधान होईन असे कधीही वाटले नव्हते. मला एखादी बरी नोकरी लागली असती तर त्या आनंदात आईने मिठाई वाटली असती, असे मोदी म्हणाले. आपल्या भाषणात विनोदाचा शिडकावा नसतो या अक्षयकुमार यांनी विचारलेल्या प्रश्नावर नरेंद्र मोदी म्हणाले की, टीआरपीच्या नादापायी आमच्या भाषणातील एखादे वाक्य मूळ संदर्भ सोडून दाखविले जाते. त्या गोष्टीची मला भीती वाटते. वैयक्तिक आयुष्यात माझे मित्र, सहकाऱ्यांबरोबर नेहमी हसतखेळत वावरतो. कधीकधी त्यांना विनोदही सांगतो. लेखी भाषण वाचून दाखविणे मला आवडत नाही.ओबामांचा सल्लानरेंद्र मोदी म्हणाले की, तुम्ही पुरेशी झोप घेत जा असा सल्ला अमेरिकेचे माजी अध्यक्ष व मित्रवर्य बराक ओबामा यांनी मला दिला होता. सतत कार्यमग्न राहाणे मला आवडते. मी दिवसभरात फक्त तीन ते साडेतीन तासच पण सुखाची झोप घेतो. त्याची आता माझ्या शरीराला सवय झाली आहे.
विरोधातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध- पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 3:51 AM