मुंबई – राज्यात वीजबिलावरुन ठाकरे सरकारने घेतलेल्या यु-टर्नमुळे विरोधकांनी सत्ताधारी पक्षांना धारेवर धरलं आहे. वीजबिलात माफी अथवा सवलत मिळणार नाही, त्यामुळे वीजबिल भरावंच लागेल असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. मात्र या निर्णयामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस मंत्र्यांच्या खात्यांना निधी मिळत नाही हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या खात्यांना निधी मिळतो, पण काँग्रेस खात्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार काँग्रेसने केली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस मंत्र्यांच्या खात्यांना निधी मिळत नाही हे खरं आहे. परंतु आम्हीदेखील हक्काने निधी मागून घेतो, लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करू, काँग्रेसच्या काही मंत्र्यांची नाराजी आहे ती दूर केली जाईल, परंतु यामुळे सरकारमध्ये कुठलीही कुरघोडी नाही असंही थोरातांनी स्पष्ट केले.
पण 'दिवाळीच्या आधी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला पॅकेज जाहीर करण्यात आलं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. तसंच पॅकेज एमएसईबीलादेखील मिळायला हवं होतं असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवलं, मात्र निधी वाटप हा अंतर्गत विषय आहे, निधी वाटपाबाबत बसून चर्चा करुन मार्ग काढता येतो, हा फार मोठा विषय आहे असं वाटत नाही, एखाद्या वेळेस निधी कमी मिळाला असेल तर मुख्यमंत्र्यांशी बोलून चर्चा करता येईल. निधीबाबत किती लोकांना फायदा होईल हे पाहून निर्णय घेतला जाईल असं शिवसेना मंत्री अनिल परब म्हणाले. मात्र आज कॅबिनेट बैठकीत या मुद्द्यावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडी सरकारकडून जनतेचा विश्वासघात- फडणवीस
महाविकास आघाडी सरकारनं जनतेचा विश्वासघात केला आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर सरकारमधील मंत्र्यांनी वीजबिलात दिलासा देण्यात येईल असं म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र यानंतरही जनतेला अवाजवी बिलं आली. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या घरातली सर्व उपकरणं २४ तास वापरल्या तरीही ५ वर्षे जितकं बिल येणार नाही, तितक्या रकमेचं बिल ३ महिन्यांसाठी आलं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मनसे रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत
वीजबिल वसुली करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे, परंतु तत्पूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन सरकारला इशाराच दिला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण"लाथो के भूत बातों से नही मानते" अशा शब्दात येणाऱ्या काळात मनसे वीजबिलाच्या माफीसाठी रस्त्यावर उतरण्याचे संकेत मिळत आहेत.