Nitin Gadkari on Sharad pawar: महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झाला आहे. या सगळ्याला शरद पवार जबाबदार आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने करत आहेत. याबद्दल एका मुलाखतीत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर एका नेत्यामुळे विचका झाला, असं म्हणणं अन्यायकारक आहे, अशी भूमिका नितीन गडकरींनी मांडली.
एबीपी माझा वृत्तवाहिनीला नितीन गडकरींनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केलं, भूमिका मांडली. 'महाराष्ट्रात राजकारणाचा विचका झालाय आणि याला कारणीभूत शरद पवार आहेत, असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आपल्याला हे मान्य आहे का?' असा प्रश्न नितीन गडकरी यांना विचारण्यात आला होता.
राज ठाकरेंच्या विधानावर नितीन गडकरींनी काय मांडली भूमिका?
या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले, "असं आहे की, राजकारणाचा विचका झालाय, हे मला मान्य आहे. पण, मी जसं सांगितलं की, कुण्या नेत्यामुळे विचका झाला हे म्हणणं अन्यायकारक आहे. कारण शेवटी कोणी काही सांगत असलं, तरी न्यायाधीश कोण आहे? मालक कोण आहे? जनता आहे."
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, "जनतेची जर दिशाभूल होत असेल, ती जर चुकीच्या मार्गावर जात असेल, तर समाजाला बदलवण्याची जबाबदारी आमची आहे."
लोकांना म्हणालो, "मी कमी पडलो"
याच मुद्द्यावर बोलताना नितीन गडकरींनी लोकसभा निवडणुकीचेही उदाहरण दिले. "मी नागपूरच्या सभेत बोललो. उत्तर नागपूरमध्ये मी ३२ हजारांनी मागे आहे. सगळ्या मतदारसंघात भरपूर मताधिक्य आहे, उत्तर नागपूरमध्ये मागे आहे. दलित बहुसंख्य मतदार आहेत तिकडे. मी त्यांना म्हटलं की, मी मागे आहे. पण, मी मागे आहे, याचा अर्थ माझं काम कमी पडलं. माझी सेवा कमी पडली. तुमचा विश्वास संपादन करण्यात मी कमी पडलो. मी स्वतःला दुरुस्त करेन आणि अजून जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन", असे मत गडकरींनी मांडले.
मी ज्या माणसाचा हात पकडतो, तो खड्ड्यात गेला तरी सोडत नाही -नितीन गडकरी
"नेत्यांना दोष देण्यात अर्थ नाहीये. हे शेवटी समाजामध्ये आपल्या सगळ्यांना मिळून आणि राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. आणि राजकारण बदललं की, मी मित्र बदलत नाही. मी ज्या माणसाचा हात पकडतो, तो खड्ड्यात गेला तरी सोडत नाही. मी नेहमी राजकारणात मैत्री वेगळी ठेवली आणि राजकारण वेगळं ठेवलं", असे उत्तर नितीन गडकरींनी या प्रश्नाला दिले.