मुंबई – सरकारला कोरोनासंदर्भात काही माहिती नाही, माहिती असती तर आम्हाला आंदोलन करावे लागले नसते, धार्मिकस्थळे सरकारने उघडली असती, प्रत्येक बाबीत आंदोलन करावी लागत आहे. राज्य सरकार कोरोनाच्या नावावर लोकांना फसवत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्याची लोकसंख्या ८ ते १० कोटी आहेत, बुद्धाने एक गोष्ट सांगितली की, जो माणूस जन्माला आला त्याला एक दिवशी मृत्यू येणारच आहे. आता १० कोटीत २००-२५० लोकांना मृत्यू आला तर त्यात नवीन काय आहे? हा निसर्गाचा नियम आहे. जर यापेक्षा जास्त लोकं दगावली असती तर काही महामारी आली असं म्हणता येईल. कोरोनामुळे कोणाचा मृत्यू होत नाही, निसर्गाच्या नियमानुसार त्याचा मृत्यू होतो. एकातरी हॉस्पिटलने पोस्टमोर्टममध्ये लिहिलं आहे का? की या माणसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे? कोविडमुळे मृत्यू झाला हे प्रमाणपत्र मिळालं आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
तसेच कोरोनावर माझा विश्वास नाही, माझ्या डोळ्याला दिसते ते मी बोलतोय, सरकारने सगळं सुरु करावे, आम्ही ५ वर्ष तुम्हाला राज्य करायला दिली आहेत. आमचं आयुष्य नियंत्रण करायला दिली नाही. घरामध्येच लोकांना डांबून ठेवण्याचा सरकारला अधिकार नाही, मला कुठे बाहेर जायचं असेल त्यावर बंदी आणता येत नाही, हा घटनेवरचा आघात आहे. मार्च, एप्रिल, मे याचे मृत्यूची आकडेवारी काढली तर मागच्या वर्षीच्या तुलनेत मृत्यू कमी झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेवर अमेरिकेने आरोप केले आहेत. जनतेच्या लुटीमध्ये WHO चाही सहभाग आहे. मागच्या १० वर्षात देशात एक दिवसही मृत्यू झाला नाही असं उदाहरण द्या. माणूस जन्माला आला त्याचा मृत्यू होणारच आहे असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, मी सातत्याने सांगतोय हे सरकार लोकांना फसवत आहे. २०१९ आणि २०२० च्या मृत्यूची आकडेवारी पाहा. भाजपाने कधीही मंदिर उघडण्याची मागणी केली नव्हती. वारकऱ्यांनी महिनाभरापासून ही मागणी केली नाही. भाजपाचं हिंदुत्व हे इतर धर्माच्या विरोधातलं आहे. आमचं आंदोलन बहुजनांसाठी आहे. बारा बलुतेदारांची दुकाने मंदिराशेजारी आहे. मंदिर सुरु झाले तर त्यांचा रोजगार सुरु होईल. धर्माची विचारसरणी ही सैविधानिक जुळलेली आहे. भाजपा हिंदुत्ववादी नव्हे तर मनुवाद्यांची पार्टी आहे. आमचा लढा हा मनुवाद्यांशी आहे. आम्ही कुठेही आमचा मार्ग बदलला आहे असं कुठेही नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट आहे.