LJP Crisis Latest Update: लोक जनशक्ती पक्षात (एलजीपी) काका पशुपती पारस आणि पुतण्या चिराग पासवान यांच्यातील वादानंतर पक्षात आता घमासान सुरू झालं आहे. पशुपती पारस यांनी मंगळवारी चिराग पासवा यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं तर दुसरीकडे चिराग पासवान यांनी पक्षाच्या पाचही खासदारांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बिहारमधीलराजकारणाला आता वेगळच वळण मिळताना दिसत आहे. कारण चिराग पासवान यांनीही आता आक्रमक भूमिका घेत राजकीय खेळी खेळली आहे.
चिराग पासवान यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवणं काही सोपं काम नसल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली आहे. दोन दिवसांपासून शांत असलेल्या चिराग पासवान यांनी आता डावपेच आखण्यास सुरुवात केलीय. "पक्षाच्या संविधानानुसार पक्षाचा अध्यक्ष स्वेच्छेनं किंवा त्यांचं निधन झाल्यानंतरच बदलता येऊ शकतं", असं पक्षाचे प्रवक्ते अशरफ अन्सारी यांनी सांगितलं. त्यामुळे चिराग पासवान हेच पक्षाचे अध्यक्षपदी अजूनही कायम आहेत असा दावा करण्यात आला आहे.
"पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक मंगळवार पार पडली. यात पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेल्या पाच खासदारांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाच्या बैठकीत कोणताही निर्णय घेताना किमान ३५ सदस्यांची उपस्थिती असणं बंधनकारक आहे. खासदारांना पक्षातून काढण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या बैठकीत ४० हून अधिक सदस्य उपस्थित होते", असं अन्सारी यांनी म्हटलं आहे. पाचही खासदारांना पक्षातून बाहेर काढण्याचा प्रस्ताव पक्षाचे मुख्य सचिव अब्दुल खलिक यांनी सादर केला आणि त्याला बहुमतानं संमत करण्यात आलं असल्याचंही अन्सारी म्हणाले.
सुत्रांच्या माहितीनुसार, पशूपती पारस यांचा गट अद्याप प्रदेश अध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांचं समर्थन मिळविण्यात यशस्वी ठरलेला नाही. दुसरीकडे चिराग पासवान यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवणं इतकी सोपी गोष्ट नसल्याचं मत राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार संतोष कुमार सिंह यांनी व्यक्त केलं आहे. लोकसभा अध्यक्ष पशूपती पारस यांच्या गटाला वेगळी मान्यता देऊ शकतात, पण पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान हेच राहतील असं सांगण्यात येत आहे.
चिराग पासवान यांची जबरदस्त खेळीचिराग पासवान यांच्याविरोधात बंडखोरी केलेल्या पाच खासदारांबाबत निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेतलं आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण चिराग पासवान यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या अधिकारांचा वापर करुन तांत्रिकदृष्ट्या बंडखोरी केलेल्या खासदारांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे पाचही खासदार निवडणूक आयोगाकडे गेले तरी चिराग पासवान यांच्याकडे पक्षाच्या बहुमतानं खासदारांना पक्षातून काढण्यात आल्याचं तगडं कारण हाताशी आहे.