मोठी बातमी! “सरकार टिकवणं ही शिवसेनेचीच जबाबदारी नाही”; शरद पवारांच्या भेटीत मुख्यमंत्री म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 10:34 AM2021-05-27T10:34:21+5:302021-05-27T10:36:57+5:30
सरकारमधील अंतर्गत कुरबुरीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत
मुंबई – राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील वाद पुन्हा उफाळून आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(NCP Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे. पवार आजारपणातून बरे झाल्यानंतर ही पहिलीच भेट आहे. या भेटीत शरद पवार यांच्यासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली. गेल्या काही दिवसांपासून पदोन्नती आरक्षणावरून सरकारमध्ये वाद सुरु असल्याचं दिसून येत आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेली खडाजंगी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर मंत्र्यांनी घेतलेला आक्षेप, त्याचसोबत मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री आवाज चढवून बोलत असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली त्याचसोबत सरकार टिकवणं ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादीची जबाबदारी आहे असं उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना सांगितले. पवारांच्या बैठकीत या विषयावर गंभीर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत टीव्ही ९ नं वृत्त दिलं आहे.
पदोन्नतीतील आरक्षण एकाएकी रद्द करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर काँग्रेस नाराज, 'सिल्व्हर ओक'वर सकाळपासून काय घडतंय? #MaharashtraPolitics#SharadPawar#NCP#UddhavThackeray#Congresshttps://t.co/D44SqvKE84
— Lokmat (@MiLOKMAT) May 27, 2021
शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. सरकारमधील अंतर्गत कुरबुरीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. पदोन्नती आरक्षणावरून काँग्रेसने आम्हीदेखील सरकारमध्ये आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतही जयंत पाटील यांनी मुख्य सचिवांना लक्ष्य केलं होतं. जयंत पाटील यांनी मुख्य सचिवांवर हल्लाबोल केल्यानं बैठकीत उपस्थित मंत्री चकित झालं होते. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना हटवून त्यांच्याऐवजी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याची चर्चा होती. दरम्यान, या प्रकारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमालीचे नाराज झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या.
अजित पवार आणि नितीन राऊत यांच्या खडाजंगी
पदोन्नतीतील आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मागील बुधवारी झाली. त्यात अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात बरीच खडाजंगी झाल्याचे समजतं. उपसमितीला न विचारताच हा ७ मे रोजीचा हा जीआर कसा रद्द करण्यात आला, सामान्य प्रशासन विभागाने परस्पर निर्णय कसा घेतला, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. त्यावेळी, मागासवर्गीयांवर अन्याय करण्याची माझीही भूमिका नाही, असे पवार यांनी राऊत यांना सुनावल्याचे समजते. राऊत आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा जीआर तातडीने रद्द करण्याची मागणी केली. त्यावर, हा सर्व विषय विधि व न्याय विभागाकडे पाठवून अभिप्राय मागवायचा व नंतर पुन्हा उपसमितीची बैठक घ्यायची, असा निर्णय झाला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर गुरुवारी सकाळपासून शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर राष्ट्रवादी नेत्यांची लगबग पाहायला मिळत आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बंगल्यावर असून थोड्याच वेळात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि इतर प्रमुख नेते पोहचतील असं सांगण्यात आलं आहे.