नवी दिल्ली - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्याबाबत उच्चारलेल्या आक्षेपार्ह शब्दावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. कमलनाथांच्या विधानावरून अनेकांनी निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या या वक्तव्याबाबत प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. राहुल यांनी या विधानाबाबत कमलनाथ यांना खडेबोल सुनावले आहेत. कमलनाथ यांनी ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर केला ती आपल्याला अजिबात मान्य नाही. ही घटना दुर्भाग्यपूर्ण आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी खडेबोल सुनावल्यानंतरही कमलनाथ यांनी माफी न मागण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचं म्हटलं आहे. "हे राहुल गांधींचं मत आहे" असं म्हणत कमलनाथ यांनी राहुल गांधींच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. "हे राहुल गांधींचं मत आहे. ते वक्तव्य करताना काय संदर्भ होता याचं स्पष्टीकरण मी दिलं आहे. त्यात अजून काही सांगण्याचं कारण नाही. जर माझा कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता तर मी माफी का मागावी?, जर कोणाला अपमानित वाटत असेल तर मी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे”.असं कमलनाथ यांनी म्हटलं आहे.
त्या विधानावरून राहुल गांधी यांनी कमलनाथ यांना सुनावले खडेबोल, म्हणाले...
केरळमधील वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींना पत्रकार परिषदेदरम्यान, कमलनाथ यांच्या आक्षेपार्ह विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, कमलनाथ माझ्या पक्षाचे आहेत. मात्र त्यांनी वापरलेली भाषा मला व्यक्तिगतरीत्या मान्य नाही. कुणीही असो मी अशा भाषेला अजिबात मान्य करणार नाही. कुणीही असो, अशी भाषा वापरणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, सामान्यपणे, मला वाटते की, देशातील महिलांबाबत प्रत्येक पातळीवर आपल्या व्यवहारात सुधारणा होण्याची गरज आहे. मग कायदा आणि सुव्यवस्था असो वा आदरभाव असो. सरकार, व्यवसाय आणि कुठल्याही अन्य क्षेत्रात त्यांच्या स्थानाबाबत असो. देशातील महिला देशाचा गौरव आहे, त्याचे रक्षण झाले पाहिजे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेल्या कमलनाथ यांनी शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि डबरा विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुतील भाजपा उमेदवार असलेल्या इमरती देवी यांचे नाव न घेता आयटम असा उल्लेख केला होता. या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला असून, कमलनाथ यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
इमरती 'देवी' तर कमलनाथ 'महिषासूर', 'आयटम'वादावर "तो" फोटो व्हायरल
इमरती देवी यांचा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आयटम असा उल्लेख केल्याने मोठा वाद निर्माण झालेला आहे. अनेकांनी कमलनाथांवर जोरदार निशाणा साधत टीकास्त्र सोडलं आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर देखील या प्रकरणावरून संताप व्यक्त केला जात आहे. 'आयटम'वादावरून सध्या एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये इमरती देवींना 'देवी' तर कमलनाथ यांना 'महिषासूर' बनवले आहे. सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये इमरती देवी यांना देवीच्या (महिषासूर मर्दिनी) रुपात दाखवण्यात आले आहे तर देवीच्या पायाजवळ कमलनाथ यांना महिषासुराच्या रुपात दाखवण्यात आले आहे.