बीड : पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या दसरा मेळाव्यावर राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी खोचक टीका केली होती. काही जण पराभवाचे वर्ष साजरे करायलाच बीडमध्ये येतात. वर्षभरात या मातीतल्या माणसांची कुणाला आठवण होत नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले होते. यावर पंकजा यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. पराभव साजरा करण्यात गैर काय? तो मी खिलाडूवृत्तीने स्वीकारला. इतके दिवस घरात राहिले तर घरात बसलात, असे म्हटले जायचे. आता बाहेर पडले तर पराभवाचे वर्ष साजरे करायलाच बाहेर आल्या, अशी टीका होतेय. परंतु, पराभव साजरा करायलाही नशीब लागते, असे उत्तर पंकजा यांनी दिले आहे.
पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणावर धनंजय मुंडे यांनी टीका केली. बीडमधील येडेश्वरी शुगरच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोनाच्या संकटात घरामध्ये बसले. संकटातच्या काळात मदतीला आले नाही, असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना टोला लगावला. आम्ही सुद्धा 2014 मध्ये पराभूत झालो, पण जनतेला वाऱ्यावर सोडलं नव्हते असंही धनंजय मुंडेंनी म्हटले.
विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा पराभव केला होता. भाजपाने पंकजांना पाडल्याचे बोलले जात होते. यानंतर पंकजा या मतदारसंघात आल्या नव्हत्या. अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्याच्यानिमित्ताने पंकजा मुंडे बीडमध्ये आल्या होत्या. धनंजय मुंडे यांच्या टीकेवर पंकजा यांनी पुण्यातून उत्तर दिले. एखादी पराभूत व्यक्ती नांदेडपासून आठ जिल्ह्यांमध्ये स्वागत सत्कार घेतल्यानंतर मोठा मेळावा घेत असेल तर ही पुण्याईच म्हणावी लागेल. अशाप्रकारे पराभव साजरा करायचं नशीब कुणाला लाभतं, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्यानिमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी धनंजय मुंडे यांना पंकजा यांच्याशी संवाद साधला का, अशी विचारणा करण्यात आली. तेव्हा धनंजय मुंडे यांनी, ‘एखाद्या प्रश्नावर प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असेल तर संवाद झाला तर काय वाईट आहे’, असे उत्तर दिले. पंकजा मुंडे यांनीही जनतेच्या प्रश्नावर एकत्र येण्यात काही वावगे नसल्याचे सांगितले. परंतु, याचा अर्थ मागचं सगळं मिटल असाही नाही, असेही पंकजा यांनी सांगितले.