जळगाव : दोन दिवस आधी मुक्ताईनगर दौऱ्यावर आलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिली. मात्र ही भेट फडणवीस यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या आग्रहाखातर दिली असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीष महाजन यांनी केले.
भाजपतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने नीट बाजू न मांडल्याचा आरोपदेखील यावेळी महाजन यांनी केला. त्यामुळे भाजपतर्फे हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या आग्रहाखातर त्यांच्या घरी गेले होते. रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्यामुळे तेथे जाणे क्रमप्राप्त होते. तसेच एकनाथ खडसे आणि फडणवीस यांच्यात कोणतीही चर्चा आपल्या समोर झालेली नाही आणि यामागे कोणतेही राजकीय संकेत नाहीत.
मनपात भाजप नगरसेवक पुन्हा शिवसेनेत गेल्याच्या मुद्द्यावर बोलताना महाजन यांनी सांगितले की, जे गेले ते कावळे आणि जे राहिले ते मावळे या उक्तीनुसारच आम्ही काम करत आहोत. सरकार गेल्यावर ज्यांना चिरीमिरी करायची होती ते तेथे गेले. अनेकांवर दबावदेखील टाकण्यात आल्याचा आरोप महाजन यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला.