मुंबई – मोफत वीज देण्याची मागणी कोणी केली नव्हती तर मंत्री घोषणा करून मोकळे झाले होते, या तीन पक्षाच्या सरकारमध्ये फक्त पदांसाठी संघर्ष सुरू आहे, मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चाललंय ते समजत नाही, उपमुख्यमंत्री निर्णय झाला नसल्याचं सांगतात, काँग्रेसचं अस्तित्वच सरकारमध्ये नाही अशी टीका भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकावर केली होती,
यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे, देशमुखांनी ट्विट करत म्हटलंय की, विखे पाटील जी, सरकारचं एकदम व्यवस्थित चाललंय! तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं भाजपमध्ये तुमची घुसमट होतेय.काल परवा अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत ते दिसलंय. तुम्हाला बसायला देखील खुर्ची नव्हती. मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चाललांय. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच असा टोला अनिल देशमुखांनीराधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला आहे.
शुक्रवारी भाजपाकडून वीजबिलाच्या वाढीबाबत राज्यभरात आंदोलन घेण्यात आलं होतं, महावितरणच्या कार्यालयांना टाळेठोको आंदोलन कार्यकर्त्यांनी केले. विखे पाटलांच्या नेतृत्वात वीज कंपन्यांविरोधात राहता येथे आंदोलन करण्यात आले, यावेळी ठाकरे सरकारवर टीका करताना विखे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीत कधीच बिघाडी झाली आहे. सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांकडे जनतेसाठी कोणताही कार्यक्रम नसल्याने वीजबिलाचे निर्णय जनतेवर लादले आहेत. वसुलीसाठी सक्ती कराल तर संतप्त जनता प्रकाशगडावर धडकेल असा इशारा विखे पाटील यांनी दिला होता.
काय घडलं होतं अण्णा हजारेंच्या पत्रकार परिषदेत?
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषण आंदोलनास बसणार होते, मात्र तत्पूर्वी राज्यातील भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्या संवादानंतर अण्णा हजारेंनी उपोषण आंदोलन मागे घेतले, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी आणि भाजपा नेत्यांनी राळेगणसिद्धीत येऊन अण्णा हजारेंची भेट घेतली होती, या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागे राधाकृष्ण विखे पाटील उभे राहिल्याचं पत्रकार परिषदेत दिसून आलं, कधीकाळी मंत्री आणि विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना बसण्यासही खुर्ची नसल्याचं पाहून गृहमंत्री अनिल देशमुखांनी ही टीका केली आहे.