नवी दिल्ली - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. तसेच त्यांनी ही गर्दी एका खास पार्टीची असल्याचा आरोप भाजपावर केला आहे. कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणाबाजीला ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध दर्शविला. यावरूनच भाजपाने ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.
भाजपाचे नेते आणि हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे. "ममता बॅनर्जी यांच्यासाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कापड दाखवण्यासारखं आहे. याच कारणामुळे त्यांनी व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये आपलं भाषण थांबवलं" असं विज यांनी म्हटलं आहे. अनिल विज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तर दुसरीकडे 'मला वाटते की, सरकारच्या कार्यक्रमात काही मोठेपण असले पाहिजे. हा राजकीय कार्यक्रम नाही. एखाद्याला आमंत्रण केल्यानंतर अपमान करणे आपल्याला शोभा देत नाही,' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
नेताजींच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा, नरेंद्र मोदींसमोरच नाराज ममता बॅनर्जी म्हणाल्या...
ममता बॅनर्जी यांनी या कार्यक्रमात काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मी निषेध म्हणून काहीही बोलणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या कार्यक्रमादरम्यान अनेक कलाकारांनी सादरीकरण केले. तसेच, नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळी एका पोस्टल स्टॅम्पचेही अनावरण करण्यात आले. शनिवारी कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त 7 किमी लांबीच्या रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला.
'धक्के पे धक्का'! ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा झटका, आमदार अरिंदम भट्टाचार्य यांचा भाजपामध्ये प्रवेश
गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपामध्ये गेले आहेत. अशातच ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नदिया जिल्ह्यातील शांतीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह काही नेत्यांच्या उपस्थितीत अरिंदम यांना पक्षाचं सदस्यत्व देण्यात आलं आहे. भाजपा मुख्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून भट्टाचार्य यांचं स्वागत करण्यात आलं. "आज बंगालमधील तरूण बेरोजगारीच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. तरुणांना आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अद्याप त्यांना नोकरी देण्यात आलेली नाही. बंगालमध्ये ममता सरकारकडे कोणतंही व्हिजन नाही. तसेच भविष्यासाठी कोणतीही योजना नाही. भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळेच आता मी आत्मनिर्भर बंगाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारधारेसोबत काम करणार आहे" असं अरिंदम भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे.