मुंबई : भाजपबरोबर युती झाल्यामुळे गुजराती-मारवाडी-जैन मतांवर निश्चिंत असलेल्या शिवसेनेला काँग्रेसच्या आक्रमक प्रचाराचा फटका बसण्याची भीती वाटू लागली आहे. त्यात जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजवल्याच्या आरोप काँग्रेसने प्रचार सभांमध्ये केल्यामुळे येथील जैन मतदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे या तब्बल एक लाख मतदारांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांनी जैन धर्मगुरूंची नुकतीच भेट घेतली.दक्षिण मुंबईत मराठीबहुल भागांमध्येही अन्य भाषिकांचा शिरकाव झाला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मनसेचे समर्थन मिळाल्यामुळे काही प्रमाणात मराठी मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी मतांवर मदार असलेल्या शिवसेनेला आता अन्य भाषिकांचा कौल घेणेही महत्त्वाचे ठरत आहे. भाजपबरोबर पुन्हा सूर जुळून आल्यामुळे गुजराती-मारवाडी-जैन मते सहज खात्यात जमा होतील, असा शिवसेनेला विश्वास आहे. मात्र काँग्रेसनेही या मतदारांना लक्ष्य करून जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे.भाजपचे पारंपरिक मतदार असलेल्या गुजराती-मारवाडी नागरिकांमध्ये ‘शिवसेनेचा उमेदवार तुमचा नाही,’ असा प्रचार प्रतिस्पर्ध्यांकडून सुरू आहे. तर शिवसेनेने पर्युषण काळात जैन मंदिराबाहेर मांस शिजविल्याचा खोटा प्रचारही काँग्रेसने भुलेश्वर येथील जाहीर सभेत केल्याचा आरोप शिवसेना करीत आहे.या आरोपाचे शिवसेनेने खंडन केल्यानंतरही जैन नागरिक दुखावले होते. त्यामुळे ही मते विरोधात जाऊ नयेत, यासाठी शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांनी जैन धर्मगुरू यांची नुकतीच भेट घेतली.>असे आहे दक्षिण मुंबई मतदारसंघातील चित्र!दक्षिण मुंबईत सुमारे एक लाख जैन मतदार आहेत. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत हे एक लाख २८ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते. गेल्या पाच वर्षांमध्ये मनसेचा प्रभाव फार कमी झाल्याचे दिसून येते. परंतु मनसे उमेदवार गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर होता, हे विसरून चालणार नाही.काँग्रेसने जैन धर्मीयांमध्ये खोटा प्रचार केल्याचा आरोप शिवसेना करीत आहे. परंतु जैन मतदारांमधील नाराजी प्रचारावेळी जाणवू लागल्यामुळे भाजपवर विसंबून न राहता गुजराती, मारवाडी यांच्याबरोबरच जैन मतदारांपर्यंतही पोहोचण्यासाठी शिवसेनेची धावपळ सुरू आहे.
नाराज मतदारांच्या मनधरणीसाठी सेनेची जैन धर्मगुरूंकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 1:35 AM