- रवि टालेरोशोगोल्ला कुणाचा या मुद्द्यावरून पश्चिम बंगाल व ओडिशा या दोन राज्यांत वाद सुरू असताना, भाजपाने या दोन्ही राज्यांमध्ये स्वत:चे तोंड गोड करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त चालवली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपाने आधी प. बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते मुकुल रॉय यांना पावन करून घेतले. आता २०१८ मध्ये ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाचा राजीनामा दिलेले बैजयंत ऊर्फ ‘जय’ पांडा यांना पक्षात प्रवेश दिला आहे.बिजदचा राजीनामा देण्यापूर्वी पांडा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय होते. पटनायक यांचे वडील बिजू पटनायक यांच्याही ते विश्वासातेले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रापाडा मतदारसंघातून बिजदतर्फे विजयी झालेल्या पांडा यांची प्रतिमा स्वच्छ आहे. अमेरिकेतून अभियांत्रिकी व व्यवस्थापनाची पदवी घेतलेल्या पांडा यांनी सामाजिक क्षेत्रातही भरीव काम केले. तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी करण्यास मोहीम हाती घेतली. कुपोषणाविरोधात आवाज उठविला. रोजगारासाठी ओडिशातून अन्य राज्यांत स्थलांतर करणाऱ्या मजुरांचा आवाज बुलंद करण्यातही ते आघाडीवर असतात.पांडा यांना पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली बिजदने निलंबित केले होते. त्यानंतर त्यांनी पक्ष सदस्यत्व व खासदारकीचा राजीनामा दिला. तेव्हापासूनच ते कोणत्या पक्षाचा मार्ग धरणार याविषयी चर्चा सुरू होती. आता पांडांमुळे भाजपाला किती लाभ होणार व बिजदचे किती नुकसान होणार, ही चर्चा सुरू झाली आहे.हिंदी भाषिक पट्ट्यातील संभाव्य नुकसानाची भरपाई करण्यासाठी भाजपाने लक्ष केंद्रित केलेल्या राज्यांमध्ये ओडिशाचा क्रमांक वरचा आहे; मात्र केंद्रीय मंत्री धर्मेश प्रधान वगळता भाजपाकडे ओडिशामध्ये आश्वासक चेहराच नाही. ती कमतरता काही अंशी पांडा यांच्यामुळे भरून निघेल अशी शक्यता नाही, कारण ते लोकनेते नाहीत. पण बिजदला कंटाळलेल्या लोकांना भाजपा हा उत्तम पर्याय असल्याचा संदेश पोहचविण्यासाठी पांडा यांचा उपयोग होईल. त्यापेक्षाही पांडा यांच्या पत्नीच्या मालकीच्या प्रादेशिक वृत्त वाहिनीचा भाजपाला जास्त लाभ होईल, असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे. गेल्या एक दशकात दूरचित्रवाणी वाहिन्यांचा प्रभाव ओडिशामध्ये चांगलाच वाढला आहे. त्यामुळे या वृत्तवाहिनीद्वारे पक्ष घराघरात पोहचविण्याचे काम होऊ शकते, असे भाजपा नेतृत्वाला वाटत भाजपाचे संघटन बिजदच्या तुलनेत कमकुवत आहे. त्यामुळे जगतसिंगपूर, भद्रक, जाजपूर व कटक या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पांडा पक्षासाठी मोठी भूमिका निभावू शकतील, अशी अपेक्षा भाजपाला आहे. ती पार पाडण्यात पांडा यशस्वी होतात का, याचे उत्तर काळच देईल. त्यात ते यशस्वी झाल्यास त्यांची राजकीय कारकीर्द नव्या उंचीवर जाऊ शकेल; मात्र अपेक्षा पूर्ण न झाल्यास, त्यांची गत त्यांचे एकेकाळचे सहकारी बिजॉय मोहपात्रा व दिलीप रे यांच्याप्रमाणही होऊ शकेल. मोहपात्रा व दिलीप रे यांनीही पांडा यांच्याप्रमाणेच भाजपाची कास धरली होती; मात्र बराच काळ उपेक्षा झाल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी बाहेरचा रस्ता धरला! बहुधा त्यामुळेच पांडा यांनी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेण्यास बराच विलंब केला असावा.
बिजदमधून आलेले जय पांडा हे भाजपासाठी फायद्याचे?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 4:35 AM