Jamner Vidhan Sabha 2024 : कागलपाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाजामनेर विधानसभा मतदारसंघासाठीचा उमेदवार ठरला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून भाजपात असलेल्या नेत्यालाच शरद पवार गिरीश महाजन यांच्याविरोधात उतरवणार, अशी चर्चा सुरू होती. त्याला जयंत पाटलांनी त्यावर शिक्कामोर्तब केले.
शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग होताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये यात्रा पोहोचल्यानंतर ३५ वर्षांपासून भाजपाशी एकनिष्ठ असलेल्या दिलीप खोडपेंनी रामराम केला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थिती दिलीप खोडपे यांचा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी जयंत पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीबद्दल भाष्य केले.
गिरीश महाजनांविरोधात दिलीप खोडपेंना उमेदवारी
जयंत पाटील जामनेरच्या उमेदवारीबद्दल म्हणाले, "जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपेंनी आज आपल्या पक्षात प्रवेश केला. जो कोणी पक्ष उमेदवार देईल त्याचा प्रचार करणार, असे त्यांनी म्हटले. मात्र मी शरदचंद्र पवार साहेबांच्या समंतीने त्यांच्या हातात तुतारी दिली, त्यातच सर्व आलं."
"समझने वालोंको इशारा काफी हैं... खोडपे सर ही कुस्ती चितपट करतील हा आम्हाला विश्वास आहे. आता जामनेरच्या विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे", असे सांगत जयंत पाटलांनी दिलीप खोडपे गिरीश महाजनांविरोधात उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब करून टाकला.
महाजन जिंकणार की, खोडपे जायंच किलर ठरणार?
गिरीश महाजन हे सहा वेळा जामनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. ही त्यांची सातवी निवडणूक असणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत ते लाखाहून अधिक मते घेऊन निवडून आले आहेत.
२०१९ मध्ये गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गरूड यांचा पराभव केला होता. गरूड यांना ७९,७०० मिळाली होती. तर महाजन यांना १,१४,७१४ मते मिळाली होती.
आता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपातीलच नेता गळाला लावला आहे. त्यामुळे दिलीप खोडपे जायंट किलर ठरणार की, महाजन सातव्यांदा विधानसभेत जाणार याबद्दल जामनेर विधानसभा मतदारसंघात उत्सुकता आहे.