जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 07:21 PM2024-09-24T19:21:35+5:302024-09-24T19:23:59+5:30
Jayant Patil Ajit Pawar : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे झालेल्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी अजित पवारांना लक्ष्य केले. अजित पवारांनी कांदा निर्यात बंदीबद्दल माफी मागितली होती. त्यावरून जयंत पाटलांनी टोला लगावला.
Jayant Patil Challenged to Ajit pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये पोहोचली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात कांदा निर्यातबंदीचा मुद्दा मांडत असताना जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना डिवचले. अजित पवारांनीकांदा निर्यात बंदीबद्दल माफी मागितली होती. त्याचा उल्लेख करत जयंत पाटलांनी अजित पवारांना नवं आव्हान दिले.
जयंत पाटील अजित पवारांना काय म्हणाले?
शिवस्वराज्य यात्रेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, "जेव्हा शेतकऱ्याकडे कांदा असतो. तेव्हा भाजप निर्यात बंदी करतं. कांदा शेतकऱ्याकडून व्यापाऱ्याकडे गेला की, निर्यातीचे कर कमी करतं, निर्यातबंदी उठवतं. राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्याने इथे येऊन माफी मागितली. आमची माफीची अपेक्षाच नाही", अशी शब्दात जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले.
जयंत पाटील पुढे म्हणाले, "त्यांनी (अजित पवार) ठामपणाने सांगावं की, भारतामध्ये शेतीमालाच्या निर्यातील आम्ही कधीही बंदी करणार नाही. एवढं त्यांनी मोदी साहेबांकडून काम करून घेतलं ना, तरी जो खड्डा पडलाय त्यांच्यासाठी तो भरून निघेल."
"...तर थोडा विश्वास ठेवता येईल"
"देशामध्ये राहू दे, पण एवढं जरी त्यांनी सांगितलं की, कांदा निर्यातबंदी मोदींचं सरकार असेपर्यंत कधीही होऊ देणार नाही. आणि तशी लेखी ऑर्डर जर काढली. २०२९ पर्यंत नो निर्यात बंदी. कांद्यावर निर्यात शुल्क नाही, अशी गॅरंटी जर दिली, तर थोडा बहुत विश्वास ठेवता येईल", असे जयंत पाटील म्हणाले.
"शेतकऱ्यांकडे ज्यावेळी कांदा असेल, त्यावेळी बरोबर निवडणुका झालेल्या असतील. निर्यात शुल्क लावायला दिल्ली मोकळी झालेली असेल. शेतकऱ्यांना दाबून देशातील कांद्याची किंमत वाढू द्यायची नाही. पाकिस्तानातील कांदा दुसरीकडे महाग दराने विकला, तर चालतो. पण, आपला कांदा बाहेर जाऊ द्यायचा नाही. ही अशी मनात पाप असणारी प्रवृत्ती दिल्लीत पुन्हा नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या आधाराने जाऊन बसली", अशी टीका जयंत पाटील यांनी केली.